चरवेली येथे विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई–गोवा महामार्गाला लागून असलेल्या पालीनजिकच्या चरवेली येथे एका विहिरीत  आज एक बिबट्या मिळाला. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी विहिरीत पिंजरा सोडून त्याची सुटका केली. बिबट्याचा नागरी वस्तीतील वावर वाढल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे़.

चरवेली येथे महामार्गालगत राजेंद्र  लक्ष्मण कुरतडकर यांचे शेत व विहिर आहे. या विहिरीत हा बिबट्या रात्री पडला असावा. सकाळी कुरतडकर यांचा मुलगा मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याला विहिरीत पडलेला बिबट्या दिसला. त्याने आरडाओरड करुन घरच्यांना आणि शेजार्‍यांना ही माहिती दिली. लोक विहिरीकाठी जमा झाले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली.

घटनास्थळी पाली व हातखंबा येथील वाहतूक पोलीसही आले. त्यांनी गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत केली. तोपर्यंत वनविभागाच्या अधिकार्‍यांनाही माहिती दिली. वनविभागाचे लोक घटनास्थळी पिंजरा घेऊन आले़. अधिकार्‍यांनी लोकांच्या मदतीने तो पिंजरा विहिरीत सोडला. बिबट्या लगेच पिंजऱ्यात जाऊन बसला. त्याला वर काढण्यात आले.

हा मादी जातीचा बिबट्या साधारण दोन वर्षांचा असावा. त्याची लांबी 155 सेंमी व उंची 48 सेंमी होती. विभागीय वन अधिकारी दि.पो. ख़ाडे यांच्या मार्गर्दनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, पालीचे वनपाल जी. पी. क़ांबळे, देवरुखचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक न्हानू गावडे, संजय रणधीर यांनी बिबटयाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. तिला नंतर सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.