
शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बारमाही बागायती क्षेत्र असलेल्या कवठे येमाई गावात मागील आठवड्यापासून बिबट्याची दहशत पुन्हा पसरली आहे. बिबट्या पाळीव प्राण्यांना भक्ष्य करीत असल्याने शेतावर वस्ती करून राहणारे नागरिक धास्तावले आहेत. येथील राजेंद्र रामभाऊ गावडे यांच्या वस्तीनजीक सोमवारी बिबट्याने दिवसाढवळ्या सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एका मेंढीवर हल्ला करीत तिला नजीकच्या उसाच्या शेतात नेले. जवळच शेतीला पाणी देत असलेल्या बबन गावडे यांनी ही घटना पाहिली. त्यामुळे तेही घाबरले आहेत.
येडे – बोर्हाडे वस्तीवर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गाईची धार काढीत असलेले विशाल गावडे व जवळच असलेले रंगनाथ येडे यांनी गोठ्याच्या मागील बाजूस बिबट्या असल्याचे पाहिले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने बाजूकडील उसाच्या शेतात धूम ठोकली. अशा घटना वारंवार कवठे येमाई शिवारात घडत असून वन विभाग बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना राबवित नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मागील काही दिवसात बिबट्यांनी अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत त्यांना ठार मारण्याच्या घटना घडल्या आहेत. यात घोडी, शेळी,पाळीव कुत्रे यांचे नाहक बळी जात आहेत. एकीकडे कोरोना महामारीचे पुन्हा घोंगावात असलेले संकट तर दुसरीकडे बिबट्याची दहशत व पाळीव पाळीव प्राण्यांवर होत असलेले सततचे हल्ले यामुळे नागरिक हादरले आहेत. शिरूरच्या वनपाल चारुशीला काटे यांना याबाबत माहिती दिली असता गावडे यांच्या शेतानजीक तात्काळ पिंजरा लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. वन कर्मचारी लगेचच त्या ठिकाणी भेट देतील असे आश्वासन दिले होते. मात्र, सायंकाळी 5 वाजेपर्यंत वन विभागाचा एक ही अधिकारी किंवा कर्मचारी इकडे फिरकला नसल्याचे शेतकरी बबन गावडे व परिसरातील नागरिकांनी सांगितले.
बिबट्याच्या सततच्या दर्शनाने शेतावर वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांनी बिबट्याचा धसका घेतला आहे. रात्री दिसणारे बिबटे आता दिवसाही पाळीव प्राण्यांना भक्ष्य करू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावडे, येडे, बोऱ्हाडे वस्तीतील शेतकऱ्यांमधून होत आहे.


























































