
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दीक तीव्र युद्धाला तोंड फुटलंय. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी एक आरोप केला की दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत दहशतवादी कमी आणि सामान्य नागरीक जास्त मारले गेले. आझाद यांच्या या विधानानंतर लश्कर –ए-तोयबाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असून या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्याने लगेच एक प्रसिद्धीपत्रक काढून आझाद यांचे आरोप अगदी बरोबर असल्याचं म्हणत गळे काढले आहेत.
काँग्रेसने केलेल्या आरोपांमुळे भाजप भडकली असून दहशतवादी संघटनांनी काँग्रेसच्या नेत्याच्या विधानाचे समर्थन करणं हे लज्जास्पद असल्याचं प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं. तर काँग्रेसच्या काळात जेवढे दहशतवादी मारले गेले त्यापेक्षा जास्त दहशतवादी हे आमच्या काळात मारले गेल्याचं भाजप नेते आणि केंद्रीयंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. आझाद यांनी केलेलं विधान सोनिया गांधी आणि काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांना पटलंय का हे त्यांनी पुढे येऊन त्यांनी सांगायला हवं असं आवाहनही प्रसाद यांनी केलं आहे.
























































