संकल्प करुया…अगदी मनापासून

वर्षातून दोन वेळा आपण नवीन वर्ष साजरे करतो. एक गुढीपाडवा आणि दुसरे इंग्रजी वर्ष म्हणजे जानेवारी महिना. वर्षाच्या सुरुवातीला आणि वर्ष संपताना आपण वेगवेगळे संकल्प तयार करत असतो. मनात आले आणि म्हणून संकल्प पूर्ण झाला असे खरे तर होत नाही. त्यासाठी मनापासून नियोजन आवश्यक असते.

सशक्त व सकारात्मक संकल्प करणे आणि तो निभावणे सोपे कधीच नसते. त्यासाठी एखाद्या गोष्टीचा ध्यास व सातत्य लागते. प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे, काम वेगळे, आव्हाने वेगळी, पण त्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जाताना सशक्तपणे उभे राहून त्या आव्हानांच्या अडचणींचा सामना करता आला पाहिजे आणि त्यातून स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे. आपण आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी, त्याला अंतिम टप्प्यापर्यंत नेण्यासाठी प्रथम स्वतःला तयार करावे लागेल. त्या रोखाने मार्गक्रमण करण्यासाठी पावले पुढे न्यावी लागतील. नाहीतर अनेक वेळा आपण आपले संकल्प इतरांना सांगतो आणि मग ते पूर्ण न झाल्यास आपण त्यांच्या विनोदाचा विषय होऊन जातो. खरे तर नवीन वर्षात आपला एकदम कायापालट होणार, आपण काहीतरी वेगळे करणार अशा भ्रमात कधीच राहून चालणार नाही. त्यासाठी छोटी छोटी उद्दिष्टे समोर ठेवावी लागतील. छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून आपल्याला हवे असेल ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

आपल्या व्यवसायाप्रमाणे आपल्याला अनेक वेळा मेकअप करावाच लागतो, पण तो मेकअप काढण्याचे काम मात्र आपण अनेक वेळा करत नाही. मेकअप करण्याच्या अगोदर आणि नंतर असे दोन्ही वेळेस स्किन मॉइश्चराइज करणे अत्यंत आवश्यक आहे आणि तसा संकल्प आपल्याला करावा लागेल. मेकअप ठेवून कधीही झोपू नये. मेकअप हा नेहमी ऑइल किंवा मेकअप रिमूवरने काढून मग चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुतलाच पाहिजे. तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर तुम्हाला नेहमी सनस्क्रीन वापरणे अत्यंत गरजेचे आहे. टोनिंग करण्यासाठी तुम्ही रोज वॉटर वापरले तरी उत्तम. चांगल्या कंपनीचे ऑरगॅनिक रोज वॉटर किंवा घरी तयार केलेले रोज वॉटर जर तुम्ही टोनिंगसाठी वापरले तर तुमची त्वचा चांगली राहू शकेल.

नियमितपणे एखादी गोष्ट साध्य करायचा प्रयत्न केल्यास व एखादा दिवस ठरवल्यास आपल्याला उद्दिष्टांपर्यंत पोहोचता येते. त्यासाठी फक्त नियोजन आवश्यक असते. अतिमहत्त्वाकांक्षी आणि संदिग्ध संकल्प करण्यापेक्षा भविष्यातील आपली उद्दिष्टे काय आहेत हे ओळखून नवीन संकल्प करावे लागतील तरच आपण आपल्याला हवीतशी झेप घेऊ शकतो. तेव्हा वर्ष कोणतेही असो सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना दृढनिश्चय महत्त्वाचा एवढे लक्षात ठेवले तरीही आपण आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो.

या गोष्टी कटाक्षाने करा

मेकअप करताना सीटीएम हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून स्किन केअरसाठी क्लिंजिंग, टोनिंग, मॉइश्चराइज्ड (सीटीएम) करू असा संकल्प आपल्याला करावाच लागेल. क्लिंजिंग केल्यामुळे तुमच्या चेहऱयावरची घाण, धूळ निघून जाऊन तुमच्या चेहऱयाचे पर्ह्स बंद होतील व तुम्ही केलेला मेकअप आतमध्ये जाऊन तुमची त्वचा खराब होणार नाही. बऱयाच वेळा मेकअप प्रॉडक्टमध्ये केमिकल्स असलेले पदार्थ वापरले जातात. त्यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते, त्वचा काळवंडू शकते.

शिवानी गोंडाळ
(मेकअप आर्टिस्ट)
[email protected]