
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे नवे उपलष्करप्रमुख बनले आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी पांडे यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. विद्यमान उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती हे 31 जानेवारीला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते 1 फेब्रुवारीला उपलष्कर प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
सध्या पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले पांडे यांनी 37 वर्षांच्या देशसेवेच्या काळात ‘ऑपरेशन विजय’ आणि ‘ऑपरेशन पराक्रम’मध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यांमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे रक्षण करण्यासाठी ते तैनात होते. तसेच पूर्व कमांडचे प्रमुख बनण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार कमांडचे ‘कमांडर-इन-चीफ’ म्हणूनही कार्यरत होते. ते ब्रिटनच्या स्टाफ कॉलेज कॅम्बर्लीमधून पदवीधर असून त्यांची डिसेंबर 1982 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये नियुक्ती झाली होती.




























































