
जायफळ मसाल्याच्या अनेक पदार्थांपैकी एक पदार्थ. जायफळाच्या गोड वासामुळे पदार्थ खाण्याची ईच्छा होते. स्वयंपाकघरात मसाल्यांच्या पदार्थांमध्ये जायफळाला विशेष स्थान आहे. जायफळ असंख्य स्वयंपाकघरांमध्ये वापरले जात असले, तरी त्याचे उत्पादन हे इंडोनेशियामधून केले जाते. इंडोनेशियामध्ये आढळणाऱ्या मायरिस्टिका या झाडापासून जायफळ मिळते. जवळजवळ सर्व मसाल्यांप्रमाणे, त्याचा वापर केवळ चव वाढवण्यासाठीच केला जात नाही, तर यामध्ये अनेक औषधांमध्ये ही वापरले जाते. जायफळ हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
जायफळ हा एक मसाला आहे, जो जायफळाच्या झाडापासून फळांच्या स्वरूपात आपल्याला मिळतो. त्याचे वैज्ञानिक नाव मायरिस्टिका फ्रॅग्रन्स (Myristica fragrans) आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जायफळाच्या झाडापासून दोन मसाले मिळतात त्यातील एक जायफळ आणि दुसरे जावित्री होय. मिरिस्टिकाच्या झाडापासून मिळणाऱ्या फळांच्या बियांना जायफळ असे म्हणतात. जायफळाच्या बिया या एक प्रकारच्या सालीने झाकलेल्या असतात, ज्याला जावित्री असे म्हणतात.
जायफळाचा वापर हा विविध मिठाईंमध्ये केला जातो. मिठाईमधील स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते. चला तर मग जाणून घेऊयात, जायफळाचे फायदे खालीलप्रमाणे
- इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या होय. दिवसभर काम, घर आणि तणावाची समस्या निर्माण होते या सगळ्याचा झोपेवर परिणाम होतो. अशावेळी जायफळाचे सेवन करावे. यामुळे झोपेच्या समस्येवर मात करता येते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर जायफळ मिसळून प्यायल्याने झोप चांगली लागते.
- पचनक्रिया मंदावली, असेल तर तुम्ही अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी जायफळाचा उपाय जरूर करावा. पचनक्रिया सुधारण्यासाठी तसेच, पोटाचे विकार, डायरिया, पित्त होणे इत्यादी समस्यांवर मात करण्यासाठी जायफळाचे सेवन करावे.
- स्नायूंमध्ये वेदना होणे आणि ओटीपोटात दुखणे या समस्या दूर करण्यासाठी जायफळ फायदेशीर आहे. सांधे आणि स्नायूंच्या वेदनांसाठी जायफळ हा उत्तम पर्याय आहे. जायफळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, अँटीइनफ्लेमेट्री गुण आणि औषधी गुणधर्म हे दुखण्यापासून आराम मिळवून देतात. जायफळच नाही तर स्नायू किंवा सांधेदुखीवरही जायफळाच्या तेलाचा वापर करता येतो.
- वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होतात. अनेकांना सांधेदुखीचा त्रासही होतो. संधिवात झाल्यावर शरिरावर सूज येणे आणि सांधे ठणकणे असा त्रास सुरू होतो. जायफळाचे सेवन केल्यास किंवा त्याचे तेल लावल्यास सांधेदुखीची सूज आणि वेदना दूर होतात.
- जायफळाचे तेल अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते आणि कर्करोग टाळू शकते. जायफळ अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे पोटाच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करू शकते.
- मधुमेह हा देखील आजच्या जगात एक सामान्य आजार झाला आहे. केवळ वृद्धच नाही तर तरुण आणि लहान मुलेही या आजाराशी झुंज देत आहेत. यासाठी जायफळाचे सेवन करू शकता. जायफळ हा ट्रायटेरपेन्सचा (triterpenes) समृद्ध स्रोत मानला जातो. ट्रायटरपेन्समध्ये मधुमेहाविरोधी गुणधर्म असतात. जायफळ हे टाईप-2 मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते.
- चांगल्या आरोग्यासाठी दातांची काळजी घेणे, अतिशय गरजेचे आहे. जास्त साखर, सोडा किंवा कॉफीचे सेवन केल्याने दात किडणे आणि दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत दातांची काळजी घेणे गरजेचे आहे. दातांच्या अनेक समस्यांसाठी जायफळ खूप फायदेशीर ठरू शकते. जायफळ हे अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्माने समृद्ध आहे. दातांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.
- लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना या सर्वांनाच डोळ्यांच्या समस्या कधी ना कधीतरी उद्भवतात. अशा परिस्थितीमध्ये, योग्य वेळी लक्ष देणे आणि आपल्या डोळ्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जायफळाचे सेवन करणे हे फायदेशीर ठरू शकते. जायफळाचे सेवन केल्याने प्रोस्टाग्लॅंडिन (prostaglandin) नावाच्या हार्मोनचे उत्पादन नियंत्रित करून डोळ्यांच्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात.
- आजकाल प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताण असतो. तणावामुळे अनेकांना पॅनिक अटॅकचाही त्रास होतो. जायफळ किंवा जायफळाच्या तेलाचे सेवन करणे अशावेळी फायदेशीर ठरू शकते. जायफळामध्ये अँटीकॉन्व्हलसंट (anticonvulsant) गुणधर्म असतात, जे तणाव कमी करून मेंदूतील रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते.
- चांगल्या आरोग्यासाठी रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. असे न झाल्यास व्यक्ती लवकर आजारी पडू शकते. हवामानात थोडासा बदल होताच बरेच लोक आजारी पडतात किंवा सर्दी-खोकल्याला बळी पडतात. कारण, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर जायफळाचे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होईल. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
- कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत. चांगले कॉलेस्ट्रॉल आणि वाईट कॉलेस्ट्रॉल. जेव्हा शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागते तेव्हा अनेक समस्या सुरू होतात. सतत थकवा जाणवणे, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका, किडनीच्या समस्या, दृष्टी कमी होणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. जायफळाचे सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यात असलेल्या इथॅनॉलिकचा अर्क कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. परंतु, जायफळाचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
- आजकाल लठ्ठपणा ही प्रत्येकाची समस्या झाली आहे. तणाव, हार्मोनल असंतुलन, वारंवार बाहेरचे खाणे, अवेळी खाणे आणि शारिरिक व्यायामाचा अभाव ही काही त्यामागची कारणे आहेत. अशा स्थितीमध्ये वर्कआऊट्स आणि हेल्दी डाएट सोबतच स्वयंपाकघरातील काही मसाल्याच्या पदार्थांची मदत घेऊ शकता. याकरिता जायफळ गुणकारी ठरते. जायफळाच्या सेवनाने वजन कमी व्हायला मदत होते.
जायफळाचा उपयोग
जायफळाचा उपयोग तुम्ही अनेक प्रकारे करू शकता.
- स्नायू आणि सांधेदुखीमध्ये गुडघ्यांना किंवा पायांना तेल लावून मसाज करू शकता.
- जायफळाचा मसाला म्हणून वापर केल्यास चवीसोबतच आरोग्यही चांगले राहते.
- जायफळाची चव ही तिखट आणि गरम असते. जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही जायफळाचे सेवन करू शकता. चिमूटभर जायफळाची पावडर दूधात मिसळून सेवन केल्याने शरीराला आतून उष्णता मिळते.
- जायफळ तुमच्या त्वचेसाठीही अतिशय फायदेशीर आहे. जर तुम्हाला पिंपल्स किंवा डागांची समस्या असेल तर जायफळ पावडर आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण कोरडे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा एक चांगला फेस पॅक आहे.
जायफळामुळे होणारे नुकसान
जायफळाचे अनेक फायदे आहेत, तर काही तोटेही आहेत.
- जायफळाची चव खूप गरम असते. त्यामुळे, उन्हाळ्यात त्याचे सेवन करू नये.
- जायफळ जर जास्त प्रमाणात खाल्ले तर चक्कर येण्याची समस्या, अस्वस्थता, पोट खराब होणे, उलट्या होणे आणि मळमळणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
- गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जायफळाचे सेवन करू नये.
- जायफळाचे जास्त सेवन केल्याने तोंड कोरडे होऊ शकते. त्यामुळे अतिसेवन टाळावे.
- जायफळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, मात्र त्याचा योग्य वापर व्हायला हवा.


























































