थंडीच्या दिवसांत सतत चहा-कॉफी पिण्याची तलफ लागते का ? सवय टाळण्यासाठी वाचा ‘या’ टिप्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या हवेतला गारवा वाढतोय. अशा दिवसांत मस्त गरमागरम कॉफी, चहा प्यावीशी वाटते. बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरुवात वाफाळलेल्या या पेयाने होते. चहा-कॉफी घेतल्याशिवाय दिवस सुरू झालाय, असे काही जणांना वाटतच नाही. या दिवसांत थंडीच्या दिवसांत सतत ही पेये पिण्याची तलफ येते. त्यामुळे कार्यालय किंवा घरी असतानाही लोकं वारंवार या गरमागरम पेयांचा आस्वाद घेतात. काहींना दर दोन-तीन तासांनी चहा-कॉफी पिण्याची सवय असते, मात्र यामुळे अॅसिडिटीचा त्रास होतो. इतर आजारही वाढू शकतात. सतत चहा-कॉफी प्यायल्याने शरीरावर अनेक घातक परिणाम होतात. असे होऊ नये याकरिता ठरवले, तर चहा आणि कॉफीचे प्रमाण नक्की करता येऊ शकते. याविषयीचे काही उपाय जाणून घेऊयात.

नक्की काय उपाय करता येऊ शकतात ?

चहा-कॉफीला पर्याय

चहा – कॉफी पिण्याची तलप लागली असेल किंवा वारंवार चहा – कॉफी पिण्याची सवय असेल तर याला पर्याय म्हणून हेल्दी ड्रिंकचा पर्याय निवडा. चहा – कॉफी पिण्याऐवजी ग्रीन टी, हर्बल टी, हळद घातलेले दूध तसेच वेलची किंवा जायफळयुक्त दूध अशा पर्यायी हेल्दी ड्रिंकचा वापर करू शकता. या प्रकारचे हेल्दी ड्रिंक प्यायल्याने पचनशक्तीत सुधारणा होईल तसेच अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होईल. यामुळे चहा-कॉफी पिण्याची सवय हळूहळू मोडेल.

पुरेशी झोप घ्या

काही जणांना रात्री जागरण करण्याची सवय असते. रात्री जागरण केल्यामुळे संपूर्ण दिवस आळसात जातो. दिवसभरातला आलेला आळस दूर करण्यासाठी चहा-कॉफीचे अनेकदा घेतली जाते, परंतु हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. योग्य प्रमाणात झोप घेतल्याने दिवसभर फ्रेश, ताजेतवाने व उत्साही रहाल. दिवसभर फ्रेश राहिल्यामुळे आपोआपच आपली चहा किंवा कॉफी पिण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवता येईल.

रुटीनला ब्रेक द्या

जेव्हा चहा – कॉफी पिण्याची इच्छा होते तेव्हा आपल्या या रोजच्या रुटीनला काही काळ ब्रेक द्या. मित्र – मैत्रिणींसोबत किंवा सहकर्मचाऱ्यांसोबत थोडा वेळ वॉकिंग करण्याला प्राधान्य द्या. यामुळे व्यायाम तर होईलच परंतु यासोबतच चहा – कॉफी पिण्याच्या रुटीनला ब्रेक मिळेल. तसेच काही दिवसांनी हळूहळू चहा – कॉफी पिण्याची सवयदेखील सुटेल.

दिवसाची सुरुवात अशी करा

दिवसाची सुरुवात चहा – कॉफीने अजिबात करू नका. चहा – कॉफी पिण्याऐवजी सकाळी एक ग्लास गरम पाण्यात 1 टेबलस्पून लिंबाचा रस मिसळून ते पाणी प्या. यामुळे आपली पचनशक्ती सुधारून शरीराला व्हिटॅमिन ‘सी’ ची मात्रा योग्य प्रमाणात मिळेल.

संतुलित आहाराचे सेवन

रोजच्या जेवणात संतुलित आहाराचा समावेश करणे गरजेचे असते. आपल्या जेवणात आवश्यक पोषक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे, कारण यामुळे तुमच्या शरीरातील उर्जेची पातळी वाढविण्यास मदत होईल. जेव्हा तुमच्या शरीरातील उर्जेची पातळी उत्तम असेल तेव्हा जास्तीची ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्हाला चहा – कॉफी पिण्याची गरज भासणार नाही. यामुळे तुमची चहा – कॉफी पिण्याची सवय सुटेल.

चहा – कॉफी पिण्याचे मूळ कारण शोधा

चहा – कॉफी पिण्याचे मूळ कारण शोधणे आवश्यक आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला वारंवार चहा – कॉफी पिण्याची इच्छा होते या कारणांचा आढावा घ्या. चहा – कॉफी प्रमाणापेक्षा जास्त पिणे हे आरोग्याला घातक ठरणारे व्यसन आहे. ही सवय मोडण्याकरिता डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे.