दररोज फक्त 1 केळ खा, उत्तम आरोग्यासाठी सहज-सोपा उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा, असा सल्ला दिला जातो, मात्र दररोज फक्त 1 केळं खाल्ल्याने शरीर निरोगी आणि आरोग्यदायी राहू शकते. रोजच्या आहारात वेगवेगळे पौष्टिक पदार्थ, फळं, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये अशा पदार्थांचा आपण समावेश करतो. बऱ्याचदा फिटनेसकरिता आहारात सुकामेवा आणि इतर महागड्या पदार्थांचा समावेश करावा, असा अनेक जणांचा समज असतो, मात्र हा समज चुकीचा आहे. फिटनेस जपण्यासाठी केळी खाण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. केळी हे सगळीकडे अतिशय मुबलक प्रमाणात मिळणारं फळ आहे. याविषयी तज्ज्ञ सांगतात, दररोज फक्त एक केळ खा.. यामुळे शरीराला अनेक लाभ मिळतात. जे लोकं दररोज व्यायाम किंवा अंगमेहनतीची कामं करतात, त्यांनीही दिवसभरात दोन केळी खावीत. त्यापेक्षा जास्त केळी खाऊ नयेत.

आतड्यांची कार्यक्षमता वाढते

2017साली झालेल्या न्युट्रीशन बुलेटीनच्या सर्वेक्षणानुसार, केळी आतड्याच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली आहेत. आतड्याची कार्यक्षमता चांगली असली की, आपोआपच खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात. केळ्यांमुळे आतड्यातील शॉर्ट चेन फॅटी अॅसिडचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता अधिक बळकट होते.

वजन कमी करणेही शक्य

केळीमध्ये फायबर आणि प्रथिने यांचे चांगले प्रमाण असते. त्यामुळे जेव्हा आपण केळी खातो तेव्हा अधिक काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते. पण वजन घटविण्यासाठी केळी खाणार असाल तर दिवसभरातून 1 पेक्षा अधिक केळ नकोच.

त्वचेचे सौंदर्य वाढते

केळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे मँगनीज केळीमध्ये भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दररोज 1 केळ खाल्ल्यास पिंपल्स, त्यांचे काळे डाग, कोरडी निस्तेज त्वचा असा त्रास दूर होतो आणि त्वचेचे आरोग्य सुधारून ती अतिशय चमेदार तजेलदार होते.

हृदयाचे आरोग्य सुधारते

केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. हृदयाच्या आरोग्यासाठी पोटॅशियम खूप आवश्यक आहे. अनेकदा पोटॅशियमचे प्रमाण कमी झाल्याने रक्तदाबासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी आणि हृदयासंबंधी इतर काही तक्रारी उद्भवू नये, यासाठी नियमितपणे केळी खाणे फायद्याचे ठरते.

डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त

नजर तेज व्हावी, लहान मुलांना लवकर चष्मा लागू नये, डोळ्यांचे आरोग्य चांगले असावे, यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो, पण डोळ्यांच्या दृष्टीने केळीदेखील गाजराएवढीच उपयुक्त आहेत. केळीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ए असते. म्हणून लहान मुलांनाही नियमितपणे केळी खायला द्यावी.