
सामना प्रतिनिधी । मुंबई
रमाबाई नगर कॉलनीतल्या शांतीसागर पोलीस हौसिंग सोसायटीमधील इमारत क्रमांक १७ या सात मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून त्याता चौघे जखमी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. त्यात तिघी महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
रूपाली गायकर (२३), सुनीता इंगळे (२८), कोमल दळवी (१८) आणि विनायक दळवी (४३) अशी या चौघा जखमींची नावे आहेत. हे चौघेही त्या लिफ्टने खाली येत होते. दरम्यान, रोप वायर तुटल्याने चौथ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतनगर पोलीस घटनेचा तपास करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी काळे यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, विधानसभा सहसंघटक नरेश माटे, माजी नगरसेवक सुरेश आवळे, उपशाखाप्रमुख रवी जाधव, माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन जखमींना मदतीचा हात दिला.


























































