
कुणाच्या आयुष्यात कोणता प्रसंग येईल हे कधी सांगता येत नाही. धावत्या बसमध्येच अचानक ड्रायव्हर बेशुद्ध झाला आणि बस अनियंत्रित झाली. मात्र याच बसमधून प्रवास करणाऱया एका 13 वर्षीय मुलाने तत्परता दाखवत स्टेअरिंगचा ताबा घेतला आणि 66 विद्यार्थ्यांचा जीव वाचवला आहे. या लिटिल हीरोच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमेरिकेच्या मिशिगन कार्टर मिडल स्कूलची ही बस आहे. धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला चक्कर आली. त्यावेळी बसमध्ये 66 विद्यार्थी होते. बसमधील मुलांनी आरडाओरड सुरू केली. याच बसमधून प्रवास करणाऱया डीलन रीव्ह या मुलाने कसलाही विचार न करता स्टेअरिंगचा ताबा घेतला आणि सुरक्षितस्थळी बस थांबवली. त्यानंतर आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शाळेतर्फेदेखील या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.

























































