
सामना प्रतिनिधी । मुंबई
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता मुंबईतील रेल्वेचे अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याकडे रेल्वे मंत्रालयाचे लक्ष लागले आहे. त्यात परळ लोकल धावण्यासाठी फलाटाच्या रुंदीकरणाचे काम येत्या 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून नवीन वर्षात परळ लोकल धावणार आहे.
दुसरे दादर स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळ स्थानकामधील वाढती गर्दी पाहता याआधी मार्च 2019 पर्यंत परळचा फलाट परळ लोकलसाठी तयार करण्याचे उद्दिष्ट होते, परंतु आता डिसेंबर 2018 पर्यंत टर्मिनसचे काम पूर्ण करून जानेवारी 2019 पासून परळ लोकल सोडण्याचे नियोजन केले जात आहे. वासिंद ते आसनगाव नवीन रेल्वे मार्गिका, नेरूळ-सीवूड ते उरण मार्ग, नवे ठाणे स्थानक, पनवेल कोचिंग कॉम्प्लेक्स हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा असे आदेश रेल्वे बोर्डाने दिले होते. त्यातील वासिंद ते आसनगाव ते मार्गिका तयार होण्यास वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दादरऐवजी परळ लोकल
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी संबंधित विभागांना डिसेंबर 2018 पर्यंत परळ टर्मिनसचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर जानेवारी महिन्यापासून याच टर्मिनसमधून डाऊन दिशेला परळ लोकल सोडण्यात येणार आहे. दादर स्थानकातून ठाणे, कल्याण दिशेला सोडण्यात येणाऱ्या काही दादर लोकल कमी करून त्या परळ स्थानकातून सोडण्याचे नियोजन आहे. जवळपास दहा ते बारा फेऱ्यांचा विचार केला जात आहे.
- खारकोपर ते उरण हा दुसरा टप्पा सप्टेंबर 2019 पर्यंत तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ठाणे मेंटल हॉस्पिटलच्या जवळ नवीन ठाणे स्थानकाचा प्रस्ताव आहे.
























































