
तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे 10 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णसंख्या असणाऱया पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत 14 दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीला तहसीलदार सुशील बेल्हेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील वाढती कोरोनाची संख्या पाहता, 13 ते 23 ऑगस्ट या कालावधीत 10 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, यादरम्यान ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता, प्रशासन चिंतेत होते. यावर काय उपाययोजना करता येतील, याकरिता प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी बुधवारी (दि. 25) आरोग्य, महसूल व पंचायत समिती, त्याचबरोबर सरपंच, पोलीस पाटील यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत सरसकट लॉकडाऊन न करता रुग्णसंख्या जास्त असलेल्या गावांतच लॉकडाऊन करण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार 10पेक्षा जास्त ऑक्टिव्ह रुग्णसंख्या असलेल्या गावांत कडक लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
त्यानुसार या 21 गावांत आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन रॅपिड ऑण्टिजेन टेस्ट करणे, कॉण्टॅक्ट ट्रेसिंग शोधणे, बाधितांना होम आयसोलेशनमध्ये न ठेवता कोरोना सेंटरमध्ये बाधितांना क्वारंटाइन करणे, मोहिमेत चाचण्या वाढविण्यासाठी ‘नो टेस्ट, नो रेशन’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता, इतर आस्थापना बंद राहतील. सर्व दुकानदार, व्यापारी, फळे व भाजीपाला विक्रेते, दूधविक्रेते आदी व्यावसायिकांची आठवड्यातून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशान्वये पंढरपूरसह पाच तालुक्यांत संचारबंदी लागू करण्यात आली होती. या कालावधीत तालुक्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. 1 ते 12 ऑगस्ट या कालावधीत पॉझिटिव्हिटी रेट 5.86 टक्के होत़ा यामध्ये एक हजार 35 रुग्ण आढळले होते. 30 गावांमध्ये 10पेक्षा जास्त रुग्ण होते, तर 18 गावांमध्ये एकही रुग्ण नव्हता. होम आयसोलेशनमध्ये 419 रुग्ण होते.
13 ते 24 ऑगस्ट या कालावधीत पॉझिटिव्हिटी दर 3.90 टक्के आहे. यामध्ये 805 रुग्ण आढळले होते. 19 गावांमध्ये 10पेक्षा जास्त रुग्ण होते, तर 22 गावांमध्ये एकही रुग्ण नव्हता. होम आयसोलेशनमध्ये 169 रुग्ण असल्याचे प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.
लॉकडाऊन होणारी गावे
कासेगाव, भंडीशेगाव, करकंब, गादेगाव, पटवर्धन कुरोली, भोसे, खेड भाळवणी, रोपळे, लक्ष्मी टाकळी, मेंढापूर, गुरसाळे, उपरी, चळे, खरातवाडी, लोणारवाडी, सुपली, गार्डी, खर्डी, सुस्ते, कोर्टी आंबे.
‘तिसऱया लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, 21 गावांत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी याचे तंतोतत पालन करावे. तसेच पावसाळा सुरू असल्याने इतर साथीचे आजार उद्भवणार नाहीत, यासाठी आवश्यक उपाययोजना ग्रामपंचायतीने करावी.’ सुशील बेल्हेकर, तहसीलदार.

























































