अमरावतीत सोमवारपासून आठवडाभर लॉकडाऊन; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावतीत जिल्ह्यात अनलॉकनंतर पुन्हा आता लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावतीत सोमवारी रात्री 8 वाजेपासून आठवडाभर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच राज्यात 15 शहरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊन जारी होणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंची विक्री आणि बाजार बंद असणार आहेत. या काळात इतर सर्व दुकाने बंद असणार आहेत. तर उद्योग सुरू राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव वाढत असून स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे. कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूदर कमी करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने जिल्ह्यात बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे. अमरावतीत 1400 बेडची संख्या 1600 करण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये प्रामुख्याने दुकानांच्या वेळा सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार असून सदरचे निर्बंध हे १ मार्च २०२१ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत राहणार आहेत.

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागांमधील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून या भागाच्या सीमा निश्चित करून या क्षेत्रांमध्ये विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. अमरावती विभागातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरी आणि ग्रामीण भागासाठी सुधारित निर्देश देण्यात आलेले आहेत.