
लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा-कॉलेज ऑनलाईन सुरू आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयात कोरोनामुळे मुलांवर घरात बसण्याची वेळ आली. त्यांचा अधिकाधिक वेळ कार्टून्स आणि स्मार्टफोन पाहण्यात वाया जाऊ लागला. आपल्या आर्यन आणि अर्जुन या दोन्ही मुलांचा वेळ सार्थकी लावण्यासाठी सोलापुरातील प्रा. अश्विनकुमार भोपळे यांनी अनोखी शक्कल लढवली. त्यांनी मुलांना रोपं लावण्याचे प्रशिक्षण दिले. लॉकडाऊनच्या काळात या भावंडांनी तब्बल 1100 रोपटी लावली आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेल्या या उपक्रमाने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
अश्विनकुमार भोपळे हे इंजिनिअरिंग कॉलेजात प्राध्यापक आहेत. सोलापूरच्या केएलई शाळेत त्यांची दोन्ही मुले शिकतात. आर्यन नववीत तर अर्जुन पाचवीत शिकतोय. घरात अडकल्याने मुलांची चिडचीड वाढतेय हे लक्षात आल्याने प्रा. अश्विनकुमार यांनी अनोखी शक्कल लढवली.
याबाबत दैनिक ‘सामना’शी बोलताना प्रा. अश्विनकुमार म्हणाले, ‘‘मागच्या लॉकडाऊनमुळे मुलांना बाहेर खेळायला किंवा फिरायला जाता येत नव्हते. त्यामुळे मी त्यांना रोपटी लावण्याचे प्रशिक्षण द्यायचे ठरवले. ज्यामुळे त्यांचा वेळ छान जाईल आणि पर्यावरण संवर्धनासाठी हातभारदेखील लागेल.’’ पुढे ते म्हणाले, ‘‘आमच्या घराशेजारी असलेल्या मोठय़ा खड्डय़ात माती साचली होती. चिकू, आंबा, सीताफळ, पपई आदी फळांच्या बिया घरातच होत्या. खड्डय़ातील माती पिशवीत भरायची आणि प्रत्येक पिशवीत एक बी लावायची असा टास्क मुलांना दिला. या टास्कमुळे मुले खूश झाली.’’
रोपटय़ांमुळे वाढला उत्साह
गेल्या पावसाळ्यापूर्वी अश्विनकुमार यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. पावसाळ्यात बिया छान रुजल्या. रोपं तयार झालेली पाहून मुलांचा उत्साह वाढला. तयार केलेली ही रोपटी इतरांना दिली तर ते त्यांची नीट काळजी घेतील का, हे माहीत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या शेतात दोन एकरचा प्लॉट तयार केला असून त्यात ही रोपटी लावणार असल्याचे अश्विनकुमार यांनी सांगितले.
वाढदिवशी चॉकलेटऐवजी फळवाटप
भोपळे कुटुंबीय मुलांच्या वाढदिवशी शाळेत चॉकलेटऐवजी फळवाटप करतात. याबाबत ते सांगतात, ‘‘चॉकलेट मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. फळे खाणे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फळे विकत घेतल्यामुळे आपल्या शेतकऱयांना फायदा होईल. असा उपक्रम प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुलाने राबवला तर आपल्या शेतकऱयांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.

























































