lok sabha 2019 – ‘या’ पाच मुद्द्यांवर गाजणार निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आगामी लोकसभा निवडणूक पाच मुद्द्यांनी गाजणार आहे. राम मंदिराची उभारणी, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण आणि त्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न तसेच राफेलचा ‘सौदा’ आणि मोदी सरकारवर झालेली टीका, पुलवामा येथील दहशतवादी हल्ला. या हल्ल्यानंतर उफाळून आलेली देशभक्ती आणि राष्ट्रवाद हे मुद्दे या लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.

राममंदिर – राममंदिराची उभारणी भाजपला गेल्या पाच वर्षांत करता आलेली नाही. हा प्रश्न भाजप केवळ निवडणुकीच्या तोंडावर तापवत असतो, असा आरोप विरोधी पक्ष करत आले आहेत. तर अयोध्या वादावर तोडगा काँग्रेसने निर्माण केलेल्या अडथळय़ांमुळेच निघू शकला नाही, असा प्रत्यारोप भाजप करत आला आहे.

शेतकऱ्यांची ससेहोलपट – शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण आणि त्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न कायमच तापता राहिला आहे. केंद्र सरकारने छोटय़ा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याचे अंतरिम अर्थसंकल्पावेळी जाहीर केले. त्याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. तर दुसरीकडे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत सत्तेवर येताच काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे.

राफेल जेट डील – ‘राफेल’ लढाऊ विमानाच्या सौद्यात मोदी सरकारने घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे ठामपणे सतत करत आलेले आहेत. मोदी यांनी त्या ‘डील’मधून अनिल अंबानी यांचा 30 हजार कोटींचा फायदा करून दिला, असा काँग्रेसचा आरोप आहे तर भाजप सरकार राफेल ही देशाच्या संरक्षणाची गरज आहे, असे सांगत आले आहे.

पाकिस्तान – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर हवाई दलाने बालाकोट येथील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला केला, मात्र त्या हल्ल्याच्या पुराव्यांवरून भाजप आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

देशभक्ती/राष्ट्रवाद – पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाजप आणि मोदी सरकारने देशभक्ती आणि राष्ट्रवादाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. त्यामुळे पुलवामाच्या आधी ज्वलंत व चर्चेत असलेले मुद्दे बाजूला फेकले गेल्याचे चित्र दिसत आहे.