बुलढाण्यात महाविकास आघाडीचा झंझावात, उद्धव ठाकरे, शरद पवार, मुकुल वासनिक यांची आज सभा

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी रविवारी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मुकुल वासनिक हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत.

बुलढाणा मतदारसंघातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून येथे 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. गद्दार विरुद्ध निष्ठावान अशी लढत येथे होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी रविवार, 21 एप्रिल रोजी खामगाव येथील जे. व्ही. मेहता विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांची जाहीर सभा होणार आहे.