कुष्ठरोगाच्या कारणामुळे घटस्फोट मिळणार नाही, लोकसभेत विधेयक मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

यापुढे कोणालाही आपल्या साथीदाराला कुष्ठरोग झाल्याचे कारण देऊन घटस्फोट मिळणार नाही. कुष्ठरोग हा दुर्धर आजार नाही. तो बरा होऊ शकतो हे आता शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाल्यामुळे कुष्ठरोग हे घटस्फोटाचे कारण असणारी तरतूद रद्द करणारे वैयक्तिक कायदा (दुरुस्ती) विधेयक सरकारने लोकसभेत सोमवारी मांडले. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे सदस्य सभागृहात राफेल आणि सीबीआयच्या मुद्द्यावरून गदारोळ करीत असताना आवाजी मतदानाने हे विधेयक लोकसभेने मंजूर केले.

विधी राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी लोकसभेत हे विधेयक मांडले. हिंदू विवाह कायदा, मुस्लिम विवाह रद्द कायदा, घटस्फोट(ख्रिश्चनासाठी) कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू दत्तक आणि पोटगी कायद्यातील घटस्फोटाचे कारण असलेले कुष्ठरोगाचे कारण सदर विधेयकाद्वारे रद्दबातल केले. कुष्ठरोगाच्या कारणामुळे व्यक्तींमध्ये भेदभाव होत होता. मानवी हक्क आयोग आणि देशातील विविध न्यायालयांनी कायद्यातील हा भेदाभेद नष्ट करण्याचे मत वेळोवेळी व्यक्त केले होते.