लोकपालाच्या नियुक्तीसाठी केंद्राचा प्रतिनिधी अण्णा हजारेंची भेट घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
anna-hazare

सामना ऑनलाईन, नगर

लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनास केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अण्णांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच केंद्र  सरकारचा प्रतिनिधी राळेगणसिद्धीत दाखल येणार आहे. स्वतः अण्णा हजारे यांनीच पारनेरमध्ये बोलताना ही माहिती दिली.

शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती आदी मागण्यांसाठी हजारे यांनी २३ मार्च रोजी दिल्लीत आंदोलन केले होते. पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती केल्याने अण्णा हजारे यांनी २९ मार्च रोजी आंदोलन मागे घेतले होते. आंदोलन सोडतेवेळी केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आश्वासन पूर्ण होत नसल्याने अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनदा स्मरणपत्र पाठवलं होतं. आश्वासन पूर्ण न झाल्यास २ ऑक्टोबरपासून राळेगसिद्दीत बेमुदत उपोषणाचा इशाराही अण्णांनी दिला होता.

हजारे यांच्या इशाऱ्याची दाखल घेत पंतप्रधान कार्यालयाकडून हजारे यांना निरोप पाठवण्यात आला आहे. मागण्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारचा प्रतिनिधी राळेगसिद्धीत येणार असून हजारे यांच्या सहमतीने सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे असे कळवण्यात आले आहे.