LOKSABHA 2019 : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । टेंभुर्णी

माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे बारामती येथे शुक्रवार दि. २२ रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. संजय शिंदे यांनी आपल्‍या फेसबुकवर पोस्‍ट लिहून आपण राष्‍ट्रवादीत प्रवेश करणार असल्‍याचे जाहीर कले आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी पोस्‍ट शिंदे यांनी फेसबुकवर लिहिली आहे. दरम्‍यान, राष्‍ट्रवादीत प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

संजय शिंदे हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात खा. विजयसिंह मोहिते-पाटील विरोधी गटाचे नेतृत्व करत आहेत. ते सध्या सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. विविध पक्षात असलेल्या पण समविचारी असणाऱ्या नेत्यांची फळी बांधून त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्‍हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले आहे. माढा तालुक्यातील कुर्डू जिल्हा परिषद गटातून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत.

संजय शिंदे हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष असून त्‍यांनी विठ्ठल कार्पोरेशनचे संस्थापक चेअरमन या माध्यमातून साखर कारखाना व सूतगिरणीची माढा तालुक्यातील म्हैसगाव येथे उभारणी केली आहे. माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते चेअरमनही आहेत. याआधी त्‍यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, माढा तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही भूषविले आहे.

दरम्‍यान, संजय शिंदे यांना राष्‍ट्रवादीतून आणि माजी. खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपमधून उमेदवारी दिली तर माढा मतदारसंघात काटे की टक्‍कर होण्याची शक्‍यता आहे.