
योगेश पाटील । हिंगोली
नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यामध्ये विभागलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे करतात. मात्र, पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणात सातवांची अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. सातवांची अनिच्छा असतांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्लीत त्यांचे नाव धाडले. पक्षांतर्गत मोठेपणा मिरवणाऱ्या सातवांना पाच वर्षात मतदारसंघासाठी भरीव कामगिरी करता आली नाही. मात्र सध्या धनुष्यबाण हाच उमेदवार, असे म्हणत शिवसैनिकांनी गावोगावी रान पेटवायला सुरुवात केली असून या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील किनवट व हदगाव आणि विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड अशा सहा विधानसभा क्षेत्राचा हिंगोली लोकसभा मतदारसंघ आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाट असूनही काँग्रेसच्या राजीव सातव यांनी हिंमतीने निवडणूक लढवत १६३२ मतांनी विजय मिळविला. शिवसेनेचे तत्कालीन खासदार सुभाष वानखेडे हे त्यावेळी पराभूत झाले. शिवसेनेचे मजबूत नेटवर्क गावोगावी असूनही २०१४ मध्ये झालेला पराभव हा शिवसैनिकांसाठी धक्का होता. मात्र यंदा उट्टे भरून काढायच्याच निर्धाराने शिवसैनिक कामाला लागले आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणूकीदरम्यान सुभाष वानखेडे हे भाजपवासी झाले. मात्र, शिवसेनेची ताकद कमी झालेली नाही. लोकसभा मतदारसंघाचा संबंध नसलेले शेजारच्या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारीची मागणी करतात, यातूनच शिवसेनेची ताकद दिसून येते. शिवसेनेच्या उमेदवारांचा अंतीम फैसला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच करणार असून इच्छुक कामाला लागले आहेत. वसमत व हदगावला शिवसेना, हिंगोली व उमरखेडला भाजपा, किनवटला राष्ट्रवादी तर कळमनुरीत काँग्रेसचे आमदार सध्या प्रतिनिधीत्व करत आहेत. काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारणात हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव यांना मोठे स्थान आहे. मात्र, या मोठेपणाचा फायदा हिंगोली लोकसभा मतदारसंघाला गत पाच वर्षात झालेला नाही. खासदार म्हणून मोठी भरीव कामगिरी सातव यांना करता आली नाही. तथापि, मतदारसंघातील जनसंपर्क, सातव यांनी शेतकरी व नागरिकांसाठी केलेली वेगवेगळी आंदोलने ही त्यांची जमेची बाजू आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व राजीव सातव यांच्यात सुप्त संघर्ष सुरु आहे. त्यातूनच नांदेडकर दगा, फटका करतील या धास्तीने सातव यांनी अद्याप स्वत: उमेदवार असल्याचे घोषीत केले नाही.
शिवसेनेचे गावोगावी असलेले शाखांचे जाळे, शिवसैनिकांची मजबूत फळी, जनसामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी केलेली मदत, तसेच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे काम या शिवसेनेच्या जमेच्या बाजू आहेत. हिंगोली लोकसभा क्षेत्रात मराठा, हटकर, धनगर, बंजारा, आदिवासी, लिंगायत या प्रमुख समाजांचे मतदान असून अन्य समाज देखील आहे. २०१४ च्या निवडणूकीत काँग्रेसच्या सातवांना ४ लाख ६७ हजार ३९७ तर शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना ४ लाख ६५ हजार ७६५ मते मिळाली. बसपाच्या उमेदवाराला २५ हजार १४५ मते मिळाली होती. आता २०१९ मध्ये ८ लाख ७० हजार ७२८ पुरुष व ७ लाख ८८ हजार ७०० असे एकूण १६ लाख ५९ हजार ४२८ मतदार असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.


























































