लोकशाहीर बशीर मोमीन यांना ‘विठाबाई’ जीवनगौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्य शासनातर्फे तमाशा क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी देण्यात येणारा ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर 2018’ जीवनगौरव पुरस्कार लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर झाला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील दत्तोबा फुलसुंदर, लता पुणेकर, जयमाला इनामदार, प्रकाश खांडगे, विद्याधर जिंतीकर व श्यामल गरुड यांच्या समितीने लोकशाहीर मोमीन यांची निवड एकमताने केली.

बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांचा जन्म शिरुर तालुक्यातील कवठे (येमाई) गावात 1 मार्च 1947 रोजी झाला आहे. त्यांनी बाईने दावला इंगा, इस्वानं घेतला बळी, तांबडं फुटलं रक्ताचं, भंगले स्वप्न माझे, भक्त कबीर व सुशीला मला क्षमा कर अशी सहा वगनाटय़े लिहिली आहेत. वेडात मराठे दौडले सात, लंका कुणी जाळली या ऐतिहासिक नाटकांचे त्यांनी लेखन केले. बशीर मोमीन यांनी नेताजी पालकर, भ्रमाचा भोपळा व भंगले स्वप्न माझे या वगनाटय़ात त्यांनी भूमिका केल्या आहेत. तसेच दत्ता महाडिक पुणेकर, काळू-बाळू लोकनाटय़, रघुवीर खेडकर लोकनाटय़ मंडळ, गंगाराम बुका कवठेकर अशा नामांकित लोकनाटय़ मंडळात त्यांनी वेगवेगळय़ा भूमिका पार पाडल्या आहेत. तमाशा क्षेत्रातील कलाकंतामध्ये त्यांची साहित्यिक अशी ओळख आहे. मोमीन यांच्या साहित्याकर पुणे विद्यापीठात पीएच.डी. करण्यात आली असल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच नवसाची यमाई, कलगी तुरा, अष्टविनायक गीते, सत्वाची अंबाबाई, वांग्यात गेली गुरं, रामायण कथा, कऱ्हा नदीच्या तीरावर, येमाईचा दरबार हे त्यांचे अल्बम रिलीज झालेले आहेत.