
सामना ऑनलाईन। साऊदम्पटन
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘चोकर्स’चा डाग पुसण्याच्या इराद्याने इंग्लंडच्या स्वारीवर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला सुरुवातीपासूनच दुखापतीचे ग्रहण लागले आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज डेल स्टेन दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून ‘आऊट’ झाल्याने त्यांच्या मोहिमेला मोठा धक्का बसलाय. स्टेनच्या जागेवर डावखुरा वेगवान गोलंदाज ब्यूरेन हेन्रीक्सला पाचारण करण्यात आले आहे.
इंग्लंडकडून आणि नंतर बांगलादेशकडून हार पत्करावी लागल्याने दक्षिण आफ्रिकेच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. त्यातच खांद्याच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज डेल स्टेन वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट झाला. याचबरोबर महत्त्वाचा फलंदाज हाशिम अमला व आणखी एक वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी जायबंदी असल्याने दक्षिण आफ्रिकेचा पाय आणखी खोलात गेला आहे. लागोपाठच्या दोन पराभवांनंतर फाफ डू प्लेसिसच्या या संघाची गाठ आता उद्या, 5 जूनला बलाढय़ ‘टीम इंडिया’शी पडणार आहे. लागोपाठच्या दोन पराभवांमुळे मनाने खचलेल्या आणि ऐन मोहिमेच्या वेळी प्रमुख क्रिकेटपटू जायबंदी झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषक स्पर्धेतील पुढील प्रवास आणखी खडतर झाला आहे एवढे नक्की.
डेल स्टेनच्या खांद्याला दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे दोन वर्षांत त्याने खूपच कमी क्रिकेट खेळले आहे.
आमला, एनगिडी वर्ल्ड कपमध्ये जखमी
इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या लढतीत जोफ्रा आर्चरचा एक बाऊन्सर हेल्मेटला लागल्याने हाशिम अमलाला रिटायर हर्ट व्हावे लागले. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने आमलाला खेळवले नाही. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत आखूड टप्प्याची गोलंदाजी करण्याच्या नादात एनगिडीच्या मांडीचा स्नायू दुखावला.


























































