सातव्या वेतना आयोगासाठी लाँगमार्च, नगरमधून प्रारंभ; महापालिकेचे 1200 कर्मचारी होणार सहभागी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनपा कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करावा व सफाई कर्मचाऱयांमधील मागासवर्गीयांनाही अनुकंपा तत्त्वाखाली नोकरीचे लाभ मिळावेत, या प्रमुख मागण्यांसाठी उद्या नगर ते मुंबई मंत्रालय असा लाँगमार्च काढण्यावर महापालिका कामगार संघटना ठाम आहेत. दरम्यान, या संदर्भात शनिवारी आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त पंकज जावळे व संघटनेच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. मात्र, त्यात तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे उद्या नगर मनपाचे 1 हजार 238 कर्मचारी मुंबईकडे लाँगमार्च काढत रवाना होणार आहेत.

मनपा कर्मचारी संघटनेच्या लाँगमार्च आंदोलनामुळे नगर महापालिकेसह जिह्यातील पाच ते सहा नगरपालिकांचे कामकाजही विस्कळीत होणार असून, या ठिकाणचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगर मनपामधील 770 कर्मचाऱयांचे सामूहिक रजेचे अर्ज संघटनेने आयुक्तांकडे सादर केले आहेत. नगर मनपा कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत सोमवारपासून नगर ते मंत्रालय असा लाँगमार्च आयोजित करण्यात आला आहे.

संघटनेच्या मागण्यांसंदर्भात शनिवारी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त जावळे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, संघटनेचे पदाधिकारी अनंत लोखंडे, आनंद वायकर, बाबासाहेब मुदगल, गुलाब गाडे, विठ्ठल उमाप, नंदकुमार नेमाने, बलराज गायकवाड आदी पदाधिकाऱयांची बैठक झाली. यावेळी जावळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱयांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले, तर आमदार जगताप यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पुढील आठवडय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
समवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. तसेच वारसा हक्काचे लाभ मिळण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय बनसोडे यांच्याशी चर्चा करून सुधारित परिपत्रक जारी करण्याचेही आश्वासन दिले. मात्र, संघटनेचे पदाधिकारी लाँगमार्च काढण्यावर ठाम आहे. मंत्र्यांबरोबर चर्चा करून तोडगा काढा, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असे संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सहभागी होणार नाहीत

पाणीपुरवठा, वैद्यकीय सेवा व अग्निशमन यंत्रणा या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचारी व सफाई कामगार आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यासाठी त्यांनी सामूहिक रजेचे अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे उद्यापासून नगर मनपाचा कारभार ठप्प पडण्याची शक्यता आहे.

श्रीरामपूर, राहुरी, देवळालीतील कर्मचारी सहभागी होणार

नगरपालिकांना सातवा वेतन आयोग लागू झाला असला, तरी लाड-बर्वे समितीच्या शिफारशी लागू न झाल्याने जिह्यातील राहुरी, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, श्रीगोंदा आणि पारनेर या पालिकांतील कर्मचारीही सामूहिक रजा टाकून नगरच्या लाँगमार्चमध्ये सहभागी होणार आहेत. यामुळे या ठिकाणच्या कामावर परिणाम होणार आहे. लाँग मार्चसाठी जिल्हाभरातील आंदोलनकर्ते रविवारी नगरमध्ये मुक्कामाला पोहचणार आहेत. याशिवाय राज्यातील अमरावती, संभाजीनगर, धुळे, सोलापूर या महापालिकांचे पदाधिकारीही आंदोलनासाठी आज नगरमध्ये दाखल होत आहेत. लाँगमार्च दरम्यान पुणे, पिंपरी- चिंचवड, मुंबई महापालिकांचे पदाधिकारीही सहभागी होणार असल्याचे नगर मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लोखंडे यांनी सांगितले.