भाजप आमदाराच्या सोशल पोस्टमध्ये नेताजींचा उल्लेख ‘दहशतवादी’; टीकेनंतर मागितली माफी, म्हणाले…

भाजपच्या नेते आमदारांकडून महापुरुषांचा अवमान वारंवार होत असतानाच गुजरातमध्ये एक प्रकरण समोर आले आहे. सोमवारी गुजरातमधील एका भाजप आमदाराने नेताजी सुभाषचंद्र बोस हे “आतंकवादी” (दहशतवादी) शाखेचे सदस्य असल्याची पोस्ट केल्यानं विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं. अखेर त्यांनी माफी मागितली. तसेच चुकीच्या भाषांतराला ही चूक झाल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजप आमदार योगेश आर पटेल म्हणाले की, इंग्रजीतून गुजरातीमध्ये भाषांतर करताना चुकीचे शब्द सोशल मीडियावर पोस्ट केले गेले.

बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली म्हणून, पटेल यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर गुजरातीमध्ये एक पोस्ट शेअर केली ज्यात म्हटले आहे की, ‘बोस हे एका दहशतवादी गटाचा (विंग) भाग होते’ सदस्य होते. त्यांनी काँग्रेस नेते म्हणून सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला होता आणि समाजवादी धोरणांचा पुरस्कार करण्यासाठी ते ओळखले जात होते.

आणंदच्या या आमदाराला या पोस्टवरून अनेकांनी लक्ष्य केले, काहींनी त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने पोस्ट हटवली.

‘सुभाषचंद्र बोस यांना दहशतवादी ठरवल्याबद्दल मी भाजप आमदार योगेशभाई यांचा निषेध करतो. पोस्ट हटवणे पुरेसे नाही. जरी ते चुकून पोस्ट केले गेले असले तरी, पटेल यांनी जाहीर माफी मागावी’, असे गुजरात आपचे अध्यक्ष इसुदन गढवी म्हणाले.

पटेल यांनी एक निवेदन जारी केले की, ‘इंग्रजीतून गुजरातीमध्ये भाषांतर करताना चुकीचे शब्द पोस्ट करण्यात आले होते’.

‘माझे अकाउंट हाताळणार्‍या व्यक्तीने बोस यांच्याबद्दल इंग्रजी मजकूर घेतला आणि ऑनलाइन अनुवाद केल्यानंतर तो माझ्या पेजवर टाकला. चुकून चुकीचा शब्द निवडला गेला आणि तो पोस्ट झाला. या चुकीबद्दल मी माफी मागतो’, असे ते म्हणाले.