
महाराष्ट्रातील प्रत्येक एसटी आगारात महाराष्ट्र राज्य लॉटरीसाठी स्टॉल देण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेने गेली अनेक वर्षे महामंडळ आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून या पुढे प्रत्येक एसटी आगारात लॉटरीचा स्टॉल लावायला एसटी महामंडळाने परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी नुकताच एक आदेश जारी केला त्यात विक्रेता संघटनेच्या मागणीला हिरवा कंदील दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर, महामंडळाने महाराष्ट्रातील सर्व एसटी नियंत्रकांना लेखी आदेश जारी केले आहेत. लॉटरीच्या तिकिटांची विक्री वाढवण्यासाठी एसटी बस आगारावर सरकारी लॉटरी तिकीट विक्री स्टॉलला परवानगी मिळाली आहे. एसटी महामंडळाचा हा निर्णय ग्राहक, विक्रेते आणि सरकारच्या हिताचे रक्षण करणारा आहे, असे मत लॉटरी विक्रेत्यांनी व्यक्त केले.
एसटी आगारात राज्य लॉटरी विक्रेत्याचा स्टॉल असावा, यासाठी सहकार्य करणार्या राज्य लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि एसटीचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांचे संघटनेने आभार मानले आहेत.
तिकिटांची विक्री वाढेल
ग्राहकांना आकर्षक बक्षिसे, विक्रेत्यांना कमिशनमधून रोजीरोटी तसेच सरकारला विक्रीतून महसूल तसेच एसटीला सरकारी योजना राबवण्याचे समाधान मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून तिकिटांची विक्रमी विक्री होण्यासाठी हे स्टॉल सहाय्यभूत ठरणार आहेत, असा विश्वास सातार्डेकर यांनी व्यक्त केला.


























































