
लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये रात्रीच्या सुमारास दरोडा पडला. सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करत पंधरा ते वीस प्रवाशांना लुटले. हे दरोडेखोर इथेच थांबले नाहीत त्यांनी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीवर बलात्कारही केला. या घटनेने प्रवासी हादरले आहेत.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन कसाऱ्याच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोचली. त्यावेळी ट्रेनचा वेग मंदावल्याने सात ते आठ जण ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली.
दरोडेखोरांच्या हातात फाइटर आणि बेल्ट होता. त्याचा धाक दाखवत या दरोडेखोरांनी प्रवाश्यांना लुटले. धक्कादायक बाब ही आहे की या दरोडेखोरांनी नंतर महिलांसोबत छेडछाड करायला सुरुवात केली. यावेळी दरोडेखोरांनी वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. दोन दरोडेखोर कल्याण ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
































































