रत्नागिरी – लम्पीची लागण झालेल्या 78 पैकी 12 गुरांचा मृत्यू

सध्या देशात तसेच राज्यातही लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येत आहे. जिल्हाभरात आतापर्यंत एकूण 78 गुरांना या आजाराची बाधा झाली असून त्यामध्ये एकूण 12 गुरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.

लम्पी स्कीन रोग हा विषाणूजन्य त्वचारोग असून, त्याचा प्रादुर्भाव पशुंना होतो. प्रामुख्याने हा आजार गायी, म्हशींमध्ये आढळत आहे. जिल्ह्यातील लम्पी स्कीन आजाराची लागण जनावरांमध्ये दिसून येत आहे. लम्पी रोगाचा फैलाव दिवसागणिक वाढत चालल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विकास विभाग सतर्क झाला आहे. लसीकरणाच्या मोहिमेवर भर देण्यात आला आहे.

दरम्यान, लम्पी प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाभरात पशुसंवर्धन विभागामार्पत जनावरांना लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच जनावरांवर फवारणीचे नियोजनही करण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यत एकूण 78 गुरांना लम्पी आजाराची लागण झालेली आहे. त्यापैकी 12 गुरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मागील जनगणनेनुसार एकूण 2 लाख 35 हजार इतके पशुपालकांकडे पशुधन आहे. त्यापैकी आतापर्यंत आढळून आलेल्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर त्या गावांतील 2 लाख गुरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. पशुपालकांनी गोठ्यांची स्वच्छता, तसेच आजारी गुरांविषयी योग्य ती खबरदारी घ्यावी. या आजाराच्या प्रतिबंधासाठी तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्प साधावा, असे आवाहन डॉ. अभिजित कसालकर यांनी केले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी, ढोकमळे, नेवरे, सडये येथील पशुपालकांची 4 गुरे बाधित आढळून आली. त्यापैकी 2 गुरे मृत झालेली आहेत. त्यामुळे या खबरदारी घ्यावी असे आवाहन जि.प.पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. अभिजित कसालकर यांनी केले.