वाळूच्या लिलावावरून झालेल्या हाणामारीत दोघा चुलत भावांचा खून, माण तालुक्यातील नरवणे येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

वाळूच्या लिलावावरून दोन कुटुंबांत झालेल्या वादाचे पर्यावसन तुफान हाणामारीत होऊन दोन सख्ख्या चुलतभावांचा मृत्यू झाल्याची घटना माण तालुक्यातील नरवणे येथे घडली आहे. कुऱ्हाडी, चाकू, लोखंडी पाइप, लाकडी दांडक्यांद्वारे झालेल्या या हाणामारीत अनेकजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चंद्रकांत नाथाजी जाधव व विलास धोंडीबा जाधव अशी मृतांची नावे आहेत. नरवणे येथे 22 फेब्रुवारी रोजी जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करण्यात आला होता. पाच ब्रास वाळूचे चंद्रकांत जाधव यांनी 33 हजार रुपये भरले होते. दरम्यान, चंद्रकांत जाधव हे बेकायदा वाळूउपसा करत असल्याची तक्रार सत्यवान जाधव यांनी तलाठ्याकडे केली होती. तर, वाळूचा लिलाव घेतल्याचे चंद्रकांत जाधव हे सांगत होते. त्यातूनच वाद वाढत गेला होता. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास चंद्रकांत जाधव व त्यांचे चुलत भाऊ विलास धोंडीबा जाधव यांच्या गटांत हाणामारी झाली. गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत जाधव व विलास जाधव यांना दहिवडीमध्ये ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हाणामारीतील जखमी सातारा येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेले आहेत. याप्रकरणी दोन्ही कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख व पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करत आहेत.