
राज्यसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार सध्या संकटात आले असून 20 मंत्र्यांकडून राजीनामे घेण्यात आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडाचे निशाण फडकवले असल्याने बंड शमविण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ नवे मंत्रिमंडळ स्थापन करणार आहेत. मात्र सिंधिया यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या 16 आमदारांना घेऊन बंगळुरू गाठलं आहे. हे आमदार मध्य प्रदेशमधील सिंधिया गटातील असल्याचे बोलले जात आहे. या 16 आमदारांमधील 6 आमदार मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आहेत. दरम्यान भाजपमधील 6 आमदारही बंगळुरू येथे पोहोचले आहेत.
राज्यसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना मध्य प्रदेश सरकारवर हे संकट ओढावलं आहे. सद्यस्थिती पाहता मध्य प्रदेशची सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपकडून काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
दिल्ली दौरा मध्येच सोडून कमलनाथ भोपाळमध्ये दाखल
मुख्यमंत्री कमलनाथ दिल्ली दौरा मधेच सोडून भोपाळमध्ये परतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे जेष्ठ नेते हे ज्योतिरादित्य सिंधिया यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भोपाळमध्ये काँग्रेसची आपत्कालीन बैठक
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भोपाळमध्ये काँग्रेस नेत्यांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसमधील अनेक नेत्यांकडून सरकार कुठल्याही प्रकारच्या अडचणीत नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

























































