
तब्बल 18 वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. ज्योतिरादित्य हे माझे जवळचे, जुने मित्र आहेत. त्यांनी आपली विचारधारा सोडून भाजपच्या गोटात जाणे पसंत केल्याचे मला मोठे दुःख आहे, असे सांगताना राहुल गांधी भावुक झाले. ज्योतिरादित्य यांची भाजपमध्ये कुचंबणा होईल, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वळचणीला गेलेले ज्योतिरादित्य यांना भाजपमध्ये योग्य सन्मान मिळेल, असे मला वाटत नाही. येत्या काळातच त्यांना त्याची जाणीव होईल. काँग्रेसची सेक्युलर विचारधारा आणि भाजप-संघाच्या धार्मिक कट्टरतावादी विचारधारेच्या चक्रव्यूहात फसण्याची वेळ ज्योतिरादित्य यांच्यावर येऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. आपल्या युवा सहकाऱयांना पक्षात एखादे मोठे पद अथवा जबाबदारी देण्याचा अधिकार आता माझ्याकडे नसल्याचे त्यांनी नमूद केले.



























































