माघी गणेश जयंतीनिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिर सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

13 फेब्रुवारीला श्रींची भव्य रथशोभायात्रा

माघी गणेश जयंतीनिमित्त प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर सज्ज झाले आहे. उद्या 10 फेब्रुवारी म्हणजेच माघ शुद्ध प्रतिपदेपासून मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 13 फेब्रुवारीला श्री गणेश जयंतीनिमित्त सायंकाळी 4 वाजता श्रींची भव्य रथ शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रेच्या समाप्तीनंतर शेजारती होणार आहे.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी येथे माघ शुद्ध प्रतिपदा 10 फेब्रुवारी ते माघ शुद्ध सप्तमी 16 फेब्रुवारीदरम्यान माघी गणेश जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. 10 फेब्रुवारीला दुपारी 2.30 ते 3.30 दरम्यान सामूहिक नामस्मरण होणार असून रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचा ‘संगीत रजनी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 11 फेब्रुवारीला सायंकाळी सव्वासहा वाजता ‘नादब्रह्म एक स्वराविष्कार’ हा कार्यक्रम चिन्मय तेंडुलकर सादर करतील. रात्री होणाऱया संगीत रजनी कार्यक्रमात गायिका केतकी माटेगावकर, सूर्यकांत सुर्वे सहभागी होतील. त्यानंतर 12 फेब्रुवारीला पार्श्वगायक सुदेश भोसले संगीत रजनी कार्यक्रम सादर करतील.

गणेश जयंती दिवशी 13 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजता श्रींची मंगलआरती व प्रार्थना होणार आहे. 14 फेब्रुवारीला पद्मश्री आनंदन सिवमनी वादन आणि गायनाचा कार्यक्रम सादर करतील. तर 15 फेब्रुवारीला पद्मश्री सुरेश वाडकर संगीत रजनीत सहभागी होतील. 16 फेब्रुवारीला रात्री पावणे नऊ वाजता गायक रोहित राऊत, जुईली राऊत, नचिकेत लेले, शंतनू मयी संगीत रजनीत सहभागी होतील.