यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘मविआ’ची सरशी, महायुती भुईसपाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला असून महायुतीचा उमेदवार सपशेल भुईसपाट झाला आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे मनीष पाटील, तर महायुतीकडून राजुदास जाधव हे उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मनीष पाटील यांचा दणदणीत विजय झाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आनंदाचे तर राजुदास जाधव यांचा पराभव झाल्याने महायुतीच्या नेत्यांमध्ये मातम बघावयास मिळत आहे.

प्रा. टिकाराम कोंगरे यापूर्वी अध्यक्ष होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी राजनामा दिला होता. तेव्हा पासून हे पद रिक्त होते. आज अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते मनीष पाटील तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते राजुदास जाधव यांना रिंगणात उतरविण्यात आले. निवडणुकीत मनीष पाटील यांनी तब्बल 15 मते मिळाली तर याउलट राजुदास जाधव यांना अवघे 6 मते मिळाली. मनीष पाटील हे यावेळी विजयी घोषित करण्यात आले. यामुळे महाविकास आघाडीत आनंदाची लाट पसरली आहे.

या बँकेत एकूण21 संचालक आहेत. यात आघाडीचे 13 तर युतीचे 6 आणि 2 अपक्ष असे संख्याबळ आहे. ही निवडणूक युतीने अगदी प्रतिष्टेची निवडणूक म्हणून केली. यावेळी रात्रीस खेळ करण्याचे अनेक प्रयत्नही झालेत. साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा अवलंबही करण्यात आला. कुठे चहा पार्टी तर कुठे ढाब्यावरही जेवणे झालीत. त्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, माजी मंत्री आमदार मदन येरावार, आमदार इंद्रनिल नाईक या निवडुकीत ताकदीने उतरले. पण महाविकास आघाडीचे संचालक मात्र कोणत्याही आमिषास बळी पडले नाहीत. सर्वानी एकजूट होऊन त्यांनी ही निवडणूक लढवली. यावेळी अपक्ष उमेदवारांनीही आघाडीकडे कौल दिला. याचमुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. मनीष पाटलांच्या विजयाने पालकमंत्री राठोड, आमदार येरावार यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का पोहोचला आहे.

लोकसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. विधानसभेची निवडणूक ही लोकसभेच्या निवडणुकीसोबत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे या निवडणुकीला आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणावयास हरकत नाही. या निवडणुकीत ज्या पद्धतीने एकसंघपणे आघाडीने निवडणूक लढवली आहे. यामुळे युतीच्या गोटात नक्केच निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि सोबतच आगामी निवडणुकीत आघाडी अशीच भक्कमपणे उभी राहिली तर युतीचा पराभव निश्चित होईल याची धास्ती युतीच्या नेत्यांना पडली आह . नुसतेच खोके देऊन कोणतीही निवडक जिंकता येत नाही याचा प्रत्यय यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आला आहे.