महानिर्मितीमध्ये मोबाईल रेंजचा घोटाळा, ‘हॅलो, हॅलो, आवाज येतोय का’ हेच शब्द कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • बापू सुळे

डोंगरदऱ्यांमध्ये असलेल्या जलविद्युत केंद्रातील वीज कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री, आणीबाणीच्या वेळी तत्काळ संपर्क करता यावा म्हणून महानिर्मितीने तब्बल अडीच कोटी रुपये खर्चून वीज केंद्राच्या परिसरात मोबाईल टॉवर उभारले आहेत. मात्र कोटय़वधी रुपयांचा खर्च करूनही वीज कर्मचाऱ्यांसाठी ते बुजगावणेच ठरले आहे. आजही कर्मचाऱ्यांच्या मोबाईलला व्यवस्थित रेंज येत नसल्याने वारंवार ‘हॅलो, हॅलो, आवाज येतोय का, रेंज नाही’ हेच शब्द वीज कर्मचाऱ्यांच्या तोंडी असतात. त्यामुळे मोबाईल टॉवर कुणासाठी उभारले, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलला रेंज येण्यासाठी की पैसे खाण्यासाठी, असा सवाल वीज कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

महानिर्मितीची कोयना, घाटघर, वैतरणा येथे जलविद्युत वीजनिर्मिती केंद्रे आहेत. सदरचा भाग डोंगराळ असल्याने वीज केंद्रात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मोबाईलला रेंज येत नसल्याने अनेकदा संपर्क करताना अडचणी यायच्या. त्याची दखल घेत महानिर्मितीने 2018-19 मध्ये तिन्ही वीज केंद्रांसाठी सुमारे 2 कोटी 43 लाख रुपये खर्चून ‘आरएफ कनेक्टिव्हिटी अॅण्ड सर्व्हिलन्स सिस्टम’अंतर्गत मिनी मोबाईल टॉवर उभारले आहेत. मात्र सुरुवातीला काही दिवस येथे रेंज येऊ लागली होती. पण पाच-सहा महिन्यांत पुन्हा मागचे दिवस पुढे आल्याने कर्मचाऱ्यांना संपर्क करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सदरचे मोबाईल टॉवर कोणासाठी उभारले होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत महानिर्मितीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

महानिर्मितीने 2018-19 मध्ये तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात सदरचे मोबाईल टॉवर उभारण्याचे काम नागपूरच्या ग्रीनलाईन सोल्यूशन या नागपूरच्या पंपनीला दिले होते.

म्हणे जिओचा टॉवर झाल्यापासून रेंज येतेय

घाटघर जलविद्युत केंद्राचे कार्यकारी अभियंता गौतम पंबोज यांच्याकडे वीज केंद्रातील मोबाईल रेंजबाबत विचारणा केली असता आधी कमी-जास्त प्रमाणात रेंज येत होती. मात्र आता जिओ पंपनीचा टॉवर वीज केंद्राच्या नजीक झाल्याने चांगल्या प्रकारे रेंज येत असल्याचे सांगितले. यावरून महानिर्मितीने उभारलेले टॉवर कुचकामी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाईल टॉवर उभारण्यासाठी केलेला खर्च

घाटघर जलविद्युत वीज प्रकल्प ः 1 कोटी 17 लाख रुपये

कोयना जलविद्युत केंद्र ः 63 लाख 43 हजार रुपये

वैतरणा जलविद्युत केंद्र ः 63 लाख 56 हजार रुपये