
महाराष्ट्र आर्म्स स्पोर्ट्स असोसिएशनद्वारे आयोजित राज्यस्तरीय आर्म्स स्पोर्टस् चॅम्पियनशिपमध्ये मुंबई विभागाने बाजी मारली असून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात पार्ले टिळक विद्यालय, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत संभाजीनगर द्वितीय क्रमांक तर कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत आर्म्स फायटिंग (पंजा लढवणे), आर्म्स पुलिंग, आर्म्स पुशिंग आदी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. सदर स्पर्धेत राज्यभरातून 300हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष जय कवळी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आर्म्स स्पोर्टस् फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष बिमल चंदा, सुमित सुशीलन अरविंद चव्हाण, राजेश गाडगे, रितेश दाभोलकर उपस्थित होते.


























































