निवडणूक आयोगावर विश्वास नाही! ‘ईव्हीएम हटाव’साठी विरोधकांची एकजूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
evm-f

सामना प्रतिनिधी । मुंबई

निवडणूक आयोगावर विश्वास नसल्याचे सांगत राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी ईव्हीएमविरोधात 21 ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, छगन भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकाप नेते जयंत पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील, आम आदमी पार्टीचे ब्रिग्रेडीयर सुधीर सावंत, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, जद सेक्युलरचे माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील यावेळी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील 371 मतदारसंघांतील मतदानात घोळ आहे. 54-55 लाख मतांचा गोंधळ आहे. निवडणुकीत जिंकून आलेल्यांनादेखील आपल्या विजयावर विश्वास नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत 220-250 जागांवर विजय मिळणार असा दावा करतात ना? मग त्यांना मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास हरकत काय आहे? का ते ईव्हीएमला कवटाळून बसले आहेत, असा सवाल यावेळी करण्यात आला. निवडणुका ईव्हीएमवर नकोत, तर मतपत्रिकेवर घ्या याची मागणी करणारे फॉर्म विरोधी पक्षांकडून राज्यातील घराघरात वाटले जाणार आहेत. भरलेले हे फॉर्म निवडणूक आयोगाला देण्यात येतील. 21 तारखेला मुंबईत ईव्हीएमविरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा राजकीय नसेल, असे यावेळी सांगण्यात आले.

येत्या 15 ऑगस्टला ग्रामसभेत ठराव करा

स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा भरत असते. राज्यातील ग्रामीण भागाने या ग्रामसभेत ईव्हीएम नकोत, तर मतपत्रिकांवरच विधानसभा निवडणुका घेण्यात याव्यात असा ठराव करावा, असे आवाहन राजू शेट्टी आणि शेकाप नेते जयंत पाटील यांनी केले.

मतदान प्रक्रिया पारदर्शक व्हावी – अजित पवार

स्वतःच्या कुटुंबातील मतेदेखील उमेदवाराला न पडल्याचे प्रकार उघडकीला आले आहेत. ईव्हीएम नको ही मागणी याआधी अनेक स्वयंसेवी संस्था आदींनी केली आहे. काही जण निवडणुकांआधी आम्हाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवितात, तितक्याच जागा त्यांना मिळतात. या सगळय़ांमुळे देशातील जनतेत संभ्रमाचे वातावरण आहे. हे दूर करायचे असेल तर विधानसभा ईव्हीएमवर न घेता मतपत्रिकांवर घ्या आणि संभ्रम दूर करा इतकीच आमची मागणी आहे. या मागणीला आम्ही आता जनआंदोलनाचे स्वरूप देणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

ईडीचा मला फरक पडत नाही – राज ठाकरे

राज ठाकरे यांना कोहिनूर टॉवरप्रकरणी ईडीकडून चौकशीला बोलाविण्यात येणार असल्याच्या बातम्या छापून आल्या आहेत. त्याबाबत विचारले असता, हे सर्व काही मला प्रसारमाध्यमांकडूनच कळत आहे. मला अद्याप कोणी ईडीचा अधिकारी विचारायला आलेला नाही. मला त्याचा काही फरकही पडत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

पारदर्शकता नसणे हे लोकशाहीला घातक – बाळासाहेब थोरात

जिथे पारदर्शकता हवी तिथे ती नसणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणून जनतेनेदेखील आता या आंदोलनात सहभाग घ्यावा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.