अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

राज्यावर एकामागून एक संकटे आली. नैसर्गिक आपत्तीनंतर कोरोनाचे संकट आले आणि आता अतिवृष्टीच्या संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला. सध्या प्रसंग कठीण आहे. त्यातच केंद्र सरकारकडून 38 हजार कोटी रुपये राज्याला येणे बाकी आहेत. पण या आपत्तीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द दिला होता.

दसरा-दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या डोळय़ात अश्रू येऊ नयेत म्हणून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत पोहोचेल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

राज्यात जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यात नुकसान झालेले ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख सहभागी झाले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व परिवहन मंत्री ऍड. अनिल परब हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी दहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुनउ&भारणीसाठी आर्थिक मदत जाहीर करीत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

संकटांचा मुकाबला

राज्य सरकार संकटांचा कसा सामना करीत आहे याची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वीही अतिवृष्टी झाली होती तेव्हापासून मदतीची आवश्यकता निर्माण झाली होती. गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून नैसर्गिक आपत्ती, कोविडचे संकट आले. पण या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम मिळून सरकारने जवळपास 30 हजार 800 कोटी रुपयांची मदत केली.

संकटामागून संकटे आली, पण जनतेच्या आशीर्वादामुळे या संकटाचा सामना सरकार खंबीरपणे करीत आहे. हे सरकार आल्यासून आतापर्यंत 9 हजार 700 कोटी रुपये केवळ विविध नैसर्गिक आपत्तीसाठी खर्च केले आहेत.

केंद्राचे पथकही आले नाही

अतिवृष्टीनंतर पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येते, पण 1 ऑक्टोबरपासून झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक अजून महाराष्ट्रात आलेले नाही. त्याची आठवणही राज्याने केंद्राला केली;. पण अजूनही पथक आलेले नाही, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिरायतीसाठी 10 हजार रु.

या मदतीच्या पॅकेजची अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, केंद्राच्या निकषाप्रमाणे जिरायती व बागायतीसाठी प्रतिहेक्टर 6 हजार 800 रुपये दिले जातात. पण ही मदत फार तुटपुंजी आहे. म्हणून राज्य सरकारच्या वतीने 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. केंद्रानेही मदतीची रक्कम वाढवण्याचे आवाहन केले.

फळपिकांसाठी 25 हजार रु.

जूनपासून आलेल्या आपत्तीत फळपिकांचेही नुकसान झाले आहे. फळपिकांसाठी केंद्राची मर्यादा प्रति हेक्टर 18 हजार रुपये आहे. पण या रक्कमेतही राज्य सरकारने वाढ केली असून फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत यावेळी त्यांनी जाहीर केली.

कोरोनासाठी मदतीची अपेक्षा

कोविडच्या संकटात ऑगस्ट महिन्यापर्यंत पीपीई किट, एन 95 मास्क यासाठी केंद्राकडून पैसे मिळत होते. पण तेही पैसे त्यांनी थांबवले. त्याचा अतिरिक्त 300 कोटी रुपयांचा आर्थिक भार राज्यावर पडत आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क वापरा असे केंद्र सरकार सांगत आहे, पण या प्राथमिक गोष्टींसाठी केंद्र सरकार मदत करणार नसेल तर सर्व गोष्टी कठीण होत जाणार आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.

केंद्राकडून दुजाभाव नको

केंद्राने देशाचे पालकत्व स्वीकारल्यावर कोणताही दुजाभाव न करता देशातील प्रत्येक राज्याला आवश्यकतेनुसार मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ही नैसर्गिक आपत्ती आहे. या काळात केंद्राने राज्य सरकारच्या मागे ठामपणे उभे राहावे. केंद्र सरकारकडून जीएसटीचे पैसे वेळेवर आले असते तर या संकटात दिलासादायक वातावरण राहिले असते. आणि अतिरिक्त कर्ज घेण्याची आवश्यकता राहिली नसती असे त्यांनी स्पष्ट केले.

…तर राज्याचा भार कमी होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या संवादाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, राज्यात अतिवृष्टी होत असताना पंतप्रधान मोदींनी स्वतःहून मला फोन केला होता. त्यांच्याकडून लवकरच ही मदत येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्राचे यापूर्वीचे पैसे मिळाले तर राज्यावरचा आर्थिक भार कमी होईल. त्याचबरोबर कोविडचा मुकाबला करण्यासाठी लागणारा पैसा केंद्राने दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

विरोधी नेत्यांनी योग्य शिकवणी घ्यावी

केंद्र सरकार राज्याला मदत करत आहे. आणि जीएसटीचे पैसे दिले आहेत असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर त्यांनी कोणत्या वर्गाची शिकवणी लावली याची कल्पना नाही, पण त्यांचा अभ्यास सुरू असेल तर योग्य शिकवणी घ्यावी. मग अभ्यास योग्य होईल, असा जबरदस्त टोला मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

तर मोदींनाही भेटेन

विरोधी पक्षांना याबाबत काही माहितीची अपेक्षा असेल तर त्यांच्यासाठीही माहितीच्या रूपाने पॅकेज देऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची आवश्यकता वाटली तर त्यांनाही भेटेन, असे त्यांनी स्पष्ट केले आणि केंद्राकडून येणाऱ्या मदतीची माहिती राज्यातील जनतेला देण्याचे माझे काम होते आणि मुख्यमंत्री म्हणून मी केलेले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले; पण पंतप्रधानांशी फोनवर बोलण्याची गरज भासल्यास फोनवर बोलेन. वेळ पडल्यास भेटेन, पुन्हा पत्र पाठवण्याची गरज भासल्यास रीतसर प्रस्ताव पाठवेन असे ते म्हणाले.

दसरा मेळाव्यात राजकीय फटकेबाजी

बिहार निवडणुकीच्या प्रचाराच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आता मी या विषयावर काही बोलणार नाही. राजकीय काही बोलायचे असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलेन; पण या गंभीर परिस्थितीत मला कोठेही राजकारण आणायचे नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आणि तुम्हीही यामध्ये राजकारण आणू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने विरोधी पक्षाच्या नेत्यांना केली.

कारण आपण विरोधी पक्षनेते असला तरी महाराष्ट्रातील जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. त्यातून राज्यातील जनतेला न्याय मिळवून देणे हे आपलेही कर्तव्य आहे. आपण सर्व एकत्र राहून केंद्रांकडून आपल्या हक्काचे पैसे आहेत ते आणू, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारवर आरोप करून पोट भरत नाही

अतिवृष्टीच्या पाहणीबाबत विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, दसऱ्यानंतर मी सर्व भागांत जाईन. नुसते दौरे करीत बसण्यात अर्थ नाही. दौरे केले आणि काहीच दिले नाही याला काही अर्थ नाही; पण काही जण नुसते आरोप करीत फिरत आहेत. त्याने लोकांचे पोट भरत नाही. सरकारवर आरोप करून जनतेचे पोट भरत नाही. माझ्यासह मंत्र्यांनी व माझ्या सहकाऱ्यांनीही दौरे केले. त्यानंतर ही मदत जाहीर केली असे मुख्यमंत्री म्हणाले.

आतापर्यंतची सर्वात मोठी मदत

केंद्र सरकारकडून आर्थिक मदत येण्याची बाकी असली तरी संकटे येण्याचे काही थांबत नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द आम्ही दिला होता. हा शब्द पूर्ण करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करीत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आतापर्यंत केलेल्या मदतीपैकी ही सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

पीक कर्जमुक्ती

यानिमित्ताने पीक कर्जमाफीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या काळात दोन लाख रुपयांची पीक कर्जमुक्ती विनासायास आपण केली. अत्यंत सुलभ पद्धतीने पीक कर्जमुक्ती केली पण या कोरोनाच्या काळात कोणाच्याही लक्षात आली नाही, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. पण एवढय़ा मोठय़ा संकटात सुलभ पद्धतीने देशातल्या कोणत्याही राज्याने कर्जमुक्ती केली नाही, असे अभिमानाने मुख्यमंत्री म्हणाले.

जनतेचे प्रेम हीच ताकद

सध्या कठीण परिस्थिती व प्रसंग आहे. जनतेची जशी पैशाची ओढाताण सुरू आहे तशी राज्य सरकारचीही ओढाताण सुरू आहे. केंद्राकडून देणे येत नाही आणि त्यातच अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान वाढत आहे. पण त्याही परिस्थितीत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने व विश्वासाने हे सरकार काम करीत आहे. तुमचे आशीर्वाद व प्रेम हीच आमची ताकद आहे. या काळात जे काही करता येईल ते सर्व करू, असे आश्वासन त्यांनी यानिमित्ताने राज्यातील जनतेला दिले.

केंद्राकडून 38 हजार कोटी येणे बाकी

राज्यावर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट आले तेव्हा केंद्राकडे 1 हजार 65 कोटी रुपयांची मागणी केली. पण अद्याप हे पैसे केंद्राकडून आलेले नाहीत. राज्य सरकारने ते पैसे दिले. त्यानंतर पूर्व विदर्भात पूर आला. त्यासाठी 800 कोटी रुपयांची मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. त्याचा एकही पैसा आलेला नाही. राज्य सरकारचे हक्काचे 38 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहे. त्याचे स्मरणपत्र केंद्राला दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आता दसरा तोंडावर आला आहे. काही दिवसांत दिवाळीचा सण आहे. सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या डोळय़ात अश्रू राहता कामा नये हा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणून दिवाळीपर्यंत प्रत्येक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश दिले आहेत.

वेळ पडल्यास कर्ज घेऊ, पण शेतकऱ्यांना व आपत्तीग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून आम्ही जनतेच्या पाठीशी उभे आहोत. पण केंद्र सरकार देशाचे पालक सरकार आहे. त्यांनीही त्यांची जबाबदारी ओळखून पार पाडली पाहिजे.

कोरोनाच्या संकटाचा सामना करताना नैसर्गिक संकटातही सरकार म्हणून आम्ही नम्रपणाने जाहीर करीत आहोत. या आपत्तीच्या काळात अजून मदत देण्याची इच्छा आहे, पण आता परिस्थितीचा अंदाज घेऊन ही मदत जाहीर केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मदतीचे पॅकेज असे आहे

2635 कोटी – रस्ते, पूल
239 कोटी – महावितरण उर्जा
1 हजार कोटी – रस्ते व पाणी पुरवठा
300 कोटी – नगरविकास
102 कोटी- जलसंपदा
5500 कोटी – शेतघरांसाठी

अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच लहान-मोठी जनावरे व घरांच्या नुकसानीसाठी भरीव मदत देण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या