
देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणेदरम्यान सुरू झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेलापूर जेट्टी आणि बेलापूर मुंबई वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत बेलापूर येथून सुरू करण्यात आलेल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आणि बेलापूर जेट्टीच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस महत्त्वाचा असून देशातील पहिली वॉटर टॅक्सी महाराष्ट्रात सुरू होत आहे. विकासात दळणवळणाची सेवा महत्त्वाची भूमिका बजावते. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, भुयारी रेल्वे यामध्ये आधुनिकीकरणाची कास धरत आज वॉटर टॅक्सी सुरू झाली. नवी मुंबईला मुंबईशी आणि एलिफंटा लेण्यांना जोडणारी ही जलवाहतूक सेवा सामान्य नागरिकांना फायदेशीर ठरेल. समुद्राचा उपयोग जलवाहतुकीसारख्या प्रकल्पांसाठी वाढला पाहिजे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री तथा ठाणे जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, बंदरे विकासमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, मंदा म्हात्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून महाराष्ट्रात 131 प्रकल्प – केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल
यावेळी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, मुंबई ते अलिबाग रो रो सेवा सुरू झाली आहे. वॉटर टॅक्सीला मिळणारा प्रतिसाद पाहून जलवाहतुकीसाठी अतिरिक्त जेट्टीचे बांधकाम केले जाईल. बंदर विकास, जेट्टीचे निर्माण अशा विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. ‘सागरमाला’ कार्यक्रमातून जलद आर्थिक विकासाला चालना देण्यात येत आहे. 1.05 लाख कोटींचे 131 प्रकल्प महाराष्ट्रासाठी निश्चित करण्यात आले आहेत. पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिह्यांतील मासेमारी करणाऱया बांधवांच्या सक्षमीकरणाचे काम करण्यात येत असल्याचे सांगतांना त्यांनी ससून डॉकसह सिंधुदुर्ग आणि रायगडच्या बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग जनसेवेसाठी
छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर हुकूमत असली पाहिजे या भावनेने त्या काळात कल्याणमध्ये आरमाराची बांधणी केली, तेव्हापासूनच या परिसराचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यानंतर इंग्रजांनी रेल्वे आणली. आपल्याकडील साधनसंपत्तीचे महत्त्व आपण किती ओळखतो आणि त्याचा जनतेला किती उपयोग करून देतो याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई परिसरात परिवहनाचे जाळे विकसित
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील 55 उड्डाणपूल, सागरी किनारा मार्ग, मुंबई-कोकणाला जोडणारा सागरी मार्ग, शिवडी- न्हावा शेवा मार्ग असे परिवहनाचे जाळे विकसित केले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून ती जगाशी हवाई मार्गाने जोडली. पण मुंबई महानगर परिसराला जोडणारी जलवाहतूक सेवा महत्त्वाची आहे. कामासाठी, उद्योग-व्यवसायासाठी मुंबईत येणाऱया सर्वसामान्य माणसाला ही सेवा अधिक उपयुक्त सिद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
लोकोपयोगी कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
नवी मुंबई विमानतळासोबतच नवी मुंबई स्पोर्ट्स सिटी म्हणून विकसित होत आहे हे सर्व लक्षात घेता येथे अनेक पायाभूत सुविधांचा राज्य शासनामार्फत विकास केला जात आहे. लोकोपयोगी कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. जनतेच्या हिताचे काम करताना केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला बलशाली बनवण्यासाठी एकत्र येऊन काम करूया. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महाराष्ट्र देईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
महाराष्ट्र सागरी मंडळाला (महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड) 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱया चित्र प्रदर्शनाचे, तिकीट काऊंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. वॉटर टॅक्सीला ध्वजांकन करून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अस्लम शेख आणि अधिकारी त्याच वॉटर टॅक्सीतून मुंबईकडे रवाना झाले. जलवाहतूक सेवा उपलब्ध करून देण्या पंत्राटदारांचा यावेळी उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




























































