
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्यातील प्रमुख देवस्थानेही पुढे सरसावली आहेत. विविध उपाययोजना करताना गर्दी टाळण्यासाठी देऊळबंदचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री क्षेत्र पंढरपुरातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर, शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर, श्रीक्षेत्र शनि-शिंगणापूर, सातारा जिल्हय़ातील श्री काळूबाई मंदिर, पालचे श्री खंडोबा मंदिर, श्री क्षेत्र गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज मंदिर, शेगावातील गजानन महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
गर्दी रोखण्यासाठी शिर्डीतील साईबाबा मंदिर आणि श्रीक्षेत्र पंढरपुरातील विठ्ठल मंदिर मंगळवारपासून दर्शनासाठी बंद झाले आहे.
रुग्ण संख्या 41 मुंबईत एकाचा मृत्यू
देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाने आज महाराष्ट्रात पहिला बळी घेतला. 5 मार्च रोजी दुबईहून परतलेल्या घाटकोपर येथील 64 वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला.
घाटकोपर येथील 64 वर्षीय वृद्ध व्यक्ती 5 मार्च रोजी दुबईहून परतला होता. 8 मार्च रोजी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयात संबंधित रुग्णाला कोरोना झाल्याचे आढळल्यानंतर तत्काळ कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्याच्या संपर्कात आलेल्या 82 कर्मचाऱयांनाही वेगळे राहण्यास सांगण्यात आले होते. या रुग्णाची पत्नी तसेच मुलालाही कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आणखी 2 कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात आणखी 2 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 41 झाली आहे. यापैकी एक रुग्ण मुंबईचा असून हा 49 वर्षांचा इसम 7 मार्च रोजी अमेरिकेहून परतलेला आहे. तर दुसरा रुग्ण हा पिंपरी-चिंचवड येथील महानगरपालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात भरती असून हा 26 वर्षीय तरुण 14 मार्च रोजी अमेरिकेहून परतलेला आहे.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती
- पिंपरी-चिंचवड 10
- पुणे 7
- मुंबई 7
- नागपूर 4
- यवतमाळ 3
- कल्याण 3
- नवी मुंबई 3
- रायगड, ठाणे, नगर, संभाजीनगर – प्रत्येकी 1
श्री विठ्ठल मंदिर 31 मार्चपर्यंत बंद राहणार
श्री विठ्ठलाच्या पायावर हात आणि डोके टेकवून दर्शन घेण्याची परंपरा असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने पसरू शकतो ही शक्यता लक्षात घेऊन मंगळवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून 31मार्चपर्यंत श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर बंद ठेवणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंदिर बंद ठेवण्याचा हा निर्णय अतिशय दुःखद आहे. मात्र, भाविकांच्या आणि पंढरपूरकरांच्या हितासाठी हा कठोर अंतःकरणाने निर्णय घ्यावा लागत असल्याचे औसेकर यांनी दाटल्या कंठाने सांगितले. यापूर्वी अशा प्रकारे मंदिर बंद करण्याची वेळ कधीही आली नव्हती असेही औसेकर यांनी स्पष्ट केले. 17 ते 31 मार्च या कालावधीदरम्यान मंदिर बंद राहील; मात्र देवाचे नित्योपचार आणि धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरूच राहतील. येत्या 4 एप्रिल रोजी चैत्री वारी आहे या वारीबाबत अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. कोरोनाचे वातावरण पाहून वारीबाबत निर्णय घेतला जाईल, असे औसेकर यांनी स्पष्ट केले.
श्रीक्षेत्र शनी शिंगणापूरचे मंदिर दर्शनासाठी बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र शनी-शिंगणापूर येथील शनी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तसेच भक्तनिवास, प्रसादालय, उपाहारगृहे, दुकानेही बंद ठेवली आहेत.
श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतार्ंलगाचे दर्शन बंद
श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतार्ंलगाचे दर्शन आज (दि. 17) दुपारी 3 वाजल्यापासून शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे यांनी दिली.
देहूतील श्री तुकाराम महाराज मंदिर 23 मार्चपर्यंत बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीकर 23 मार्चपर्यंत श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
श्री अंबाबाई मंदिर बंद, ज्योतिबा यात्रा स्थगित
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्रयात्राही पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे. श्री ज्योतिबाची चैत्रयात्राही इतिहासात प्रथमच स्थगित करण्यात आली आहे.
1941 नंतर पहिल्यांदा साईबाबा मंदिर बंद
श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी मंगळवारी दुपारी 3 पासून बंद करण्यात आले आहे. रामनवमी उत्सव साध्या पद्धतीने केला जाणार असून यात्रा रद्द केली आहे. मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. 1941 मध्ये कॉलरा साथीमुळे साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले हेते. त्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे. आजपासून पुढील आदेश येईपर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिर भक्तांना दर्शनाकरिता बंद राहील. दैनंदिन पूजा-अर्चा सुरू राहतील. दर गुरुवारी निघणारी पालखी नियमित सुरू राहील. पालखीकरिता पुजारी आणि आवश्यक कर्मचारी उपस्थित राहतील, असे अरुण डोंगरे यांनी सांगितले. दरम्यान, श्री साईप्रसादालय व भक्तनिवासस्थाने बंद राहतील. ऑनलाइन दर्शनही बंद केले आहे.
































































