कुरियर कंपन्या बनतायेत शस्त्रास्त्रांचे कोठार, तलवारी मागविण्याच्या घटनांचे पेव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरात कुरीयरद्वारे होणाऱ्या विविध वस्तूंची ने-आण आता गुंडांनी हायजॅक केल्याचे काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या नजेरआड शस्त्रास्त्र मागविण्यासाठी गुंडांकडून थेट कुरियर सेवांचा मार्ग अवलंबला जात आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी नावाजलेल्या अनेक कंपन्या बदनाम होत चालल्या आहेत. ग्राहकांनी मागविलेल्या पार्सलमध्ये किंवा पाठविलेल्या वस्तूंमध्ये नेमके काय आहे, हे तपासण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्यामुळे गुंडांचे फावले आहे. मागील काही दिवसांपासून डीटीडीसी कुरिअर सेवेद्वारे गुंडांकडून तलवारी मागविण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेषतः संभाजीनगर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घटनांनी कुरिअर सेवाही गुंडांसाठी शस्त्रास्त्रांचे अड्डे बनत चालले की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

ठिकठिकाणी कुरिअर सेवांच्या माध्यमातून तलवारीसह विविध शस्त्रास्त्रे विनासायास घरपोहोच मिळविण्याची नामी शक्कल गुंडांकडून लढविली जात आहे. त्यामुळे संबंधित भागातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. देशभरातील कोणत्याही ठिकाणांहून वस्तूंची ने-आण करताना कुरिअर कंपन्यांकडून वस्तूंबाबत जुजबी तपासणी केली जाते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे फावले जात आहे. मोठमोठी पुस्तके, गिफ्ट, लाकडी बॅट, लोखंडी वस्तू पाठविण्याच्या आडून थेट तलवारी, कोयते, कुकरी मागविण्यात येत आहेत. त्यामुळे कुरिअरची वाहतूक करताना सबडिलरकडून वस्तूंची खातरजमा का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी कुरिअर वंâपनीच्या माध्यमातून संभाजीनगरमध्ये परराज्यातून अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर तलवारी मागविण्यात आल्या होत्या. तेव्हापासून नकळतपणे कुरिअर कंपन्याद्वारेही केली जाणारी शस्त्रास्त्र वाहतूक उघडकीस आली.

पुण्यातही मार्केटयार्डनजीक डिसीडीसी कुरिअर सेंटरमध्ये तलवारी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपास पथकाने कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून जाऊन तपासणी केली. त्यावेळी पार्सलमध्ये दोन धारदार तलवारी मिळून आल्या. संबंधित तलवारी पंजाबमधील लुधियानातून मागविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्यांच्या नावाने तलवारी मागविण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडे पोलिसांनी तपास सुरू आहे. दरम्यान, पिंपरीतील दिघी परिसरात डीटीडीसी कंपनीच्या गोदामात साहित्य स्कॅनिंगवेळी तब्बल 97 तलवारी, 2 कुकरी आणि 9 म्यान असा 3 लाख 25 हजारांचा ऐवज आढळून आला. त्यानंतर दिघी पोलिसांनी तात्कळ घटनास्थळी धाव घेऊन शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला.

डिटीडीसी कंपनीच्या मध्यवर्ती कार्यालयातून जप्त केलेल्या तलवारींमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. तपासणीदरम्यान, लाकडी खोक्यातून पाठविलेल्या तलवारी आढळून आल्या. कुरिअर सेवांद्वारे शस्त्रांची वाहतूक करण्याची गुंडांची शक्कल पोलिसांच्या तपास जोखडातून मुक्त असल्याचा फायदा त्यांना होत आहे.

पोलिसांप्रमाणे कुरिअर कंपन्यांचीही जबाबदारी

कुरिअर कंपनीद्वारे कोणतेही पार्सल करण्याआधी संबंधित सब डिलरने वस्तूंची खात्री करणे आवश्यक आहे. मात्र, पार्सलची जुजबी तपासणी करणे, लाकडी बॉक्सचे पॅकिंग न उघडणे, छान आवरण असलेल्या अनेकांच्या वस्तूंसाठी कंपन्यांकडून पायघड्या घातल्या जातात. त्यामुळे पॅकिंगच्या आतमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आहे, याची पुरेशी माहिती मिळत नाही. त्यामुळे गुंडांकडून तलवारी, कोयते, कुकरीसह इतर शस्त्रास्त्र पाठविण्याचे धाडस केले जात असल्याचे पोलिसांच्या प्राथामिक तपासात निष्पन्न झाले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांप्रमाणे संबंधित कुरिअर वंâपनीचीही जबाबदारी आहे. आपल्या कुरिअरद्वारे कोणी शस्त्रास्त्र पाठवित असल्यास त्याची माहिती जवळच्या पोलिसांना देणे आवश्यक आहे. त्यानुसार कुरिअरद्वारे करण्यात येणारी शस्त्रास्त्रांची वाहतूक टाळता येणार आहे.

फक्त तलवारीच का आणखी काही

कुरिअरद्वारे फक्त तलवारींची वाहतूक होते की आणखी काही याबाबत आता नागरिकांमध्येही चर्चा आहे. पुस्तकांच्या नावाखाली होणारी अन्य वाहतूकही पोलिसांच्या रडारवर आली आहे. विशेषतः कुरिअर कंपन्यांमध्ये पार्सलच्या तपासणीसाठी नियमनयुक्त मापदंड न लावल्यामुळे अमली पदार्थसह इतर शस्त्रास्त्रांचीही वाहतूक केली जात आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.