बारावीचा राज्याचा निकाल 94.22 टक्के, कोकण आणि मुलींचीच बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. वर्षभर ऑनलाइन अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा द्याव्या लागल्या. निकाल काय असेल याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला असून यंदाच्या निकालात सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा-कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र तसेच कॉलेजस्तरावर पार पडलेल्या प्रॅक्टिकल परीक्षेमुळे सायन्स शाखेचा निकाल सर्वाधिक 98.30 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालातही कोकण विभागाने आपले वर्चस्व कायम राखले, तर मुंबईचा नंबर शेवटून पहिला आला. दरवर्षीप्रमाणे मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल सर्वाधिक लागला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून 14 लाख 39 हजार 731 विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी 13 लाख 56 हजार 604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मागील वर्षी म्हणजेच वर्ष 2021 कोरोनामुळे लेखी परीक्षा झाल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापनाआधारे निकाल जाहीर केला. त्यामुळे वर्ष 2020 च्या तुलनेत यंदाचा निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. 2020 मध्ये बारावीचा निकाल 90.66 टक्के इतका लागला होता. मुला-मुलींच्या निकालाची टक्केवारी पाहता 95.35 टक्के मुली, तर 93.29 टक्के मुले उत्तीर्ण झाले असून मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 2 टक्क्यांनी जास्त आहे.

निकालाची वैशिष्टय़े

– एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के
– 95.24 टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
– 10 हजार 47 जणांना 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण
– रिपीटर्सचा निकाल 53.02 टक्के, 35 हजार 368 पैकी 18 हजार 755 उत्तीर्ण.

सलग दहाव्या वर्षी राज्यात कोकण अव्वल

सलग दहाव्या वर्षी कोकण बोर्डाने राज्यात अव्वल नंबर पटकावला आहे. कोकण बोर्डाचा निकाल 97.21 टक्के लागला आहे. रत्नागिरी जिह्याचा निकाल 96.39 टक्के तर सिंधुदुर्गचा निकाल 98.75 टक्के लागला.

– राज्यातील 2 लाख 39 हजार 769 विद्यार्थी 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. डिस्टिंक्शन मिळविणारे सर्वाधिक विद्यार्थी यंदा संभाजीनगर जिह्यातील आहेत, तर 5 लाख 58 हजार 678 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन

बारावी परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या. या परीक्षेतील यशानंतर विद्यार्थ्यांना आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. तथापि, ही परीक्षा हे अंतिम ध्येय नाही. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही अनेक आव्हानांना सामोरे जात या परीक्षा आणि त्यांचे निकाल वेळेवर आणि यशस्वीपणे लावल्याबद्दल राज्य मंडळाचे आणि विभागातील सर्व संबंधित अधिकाऱयांचे शिक्षणमंत्र्यांनी विशेष आभार मानले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन

निकालानंतर नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन सेवा बोर्डाने सुरू केली आहे. निकालानंतर आठ दिवस समुपदेशक सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे अडचणी सोडविण्यास मदत करतील, असे राज्य शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी स्पष्ट केले.

समुपदेशकांचे मोबाईल क्रमांक
9432592358
9579159106
9923042268
7498119156
8956966152
7249005260
7387400970
9307567330
8975478247

शाखानिहाय निकाल

शाखा परीक्षा दिलेले उत्तीर्ण टक्केवारी
सायन्स 6,22,749 6,12,208 98.30
आर्ट्स 4,15,129 3,75,749 90.51
कॉमर्स 3,53,957 3,24,629 91.71
एचसीव्हीसी 46,973 43,4052 92.40
आयटीआय 923 613 66.41

कोकण 97.21
नागपूर 96.52
अमरावती 96.34
लातूर 95.25
कोल्हापूर 95.07
संभाजीनगर 94.97
नाशिक 95.03
पुणे 93.61
मुंबई 90.91