महाराष्ट्र इंटक कामगार दिनी काळ्या फिती बांधून केंद्राचा निषेध करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कामगार दिनी 1 मे रोजी महाराष्ट्र इंटकच्या वतीने केंद्र सरकारच्या कामगार हितविरोधी धोरणाचा काळय़ा फिती लावून निषेध करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष कैलास कदम आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळी 10 वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या परळ येथील महात्मा गांधी सभागृहात आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन संपन्न होत आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र इंटक तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहभागी होणार आहे. कामगारांचे खच्चीकरण करणाऱया केंद्राच्या फोर लेबर कोड बिलाचा निषेध करून ते मागे घेण्याची याप्रसंगी मागणी करण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारने कामगारविरोधी औद्योगिक धोरण राबविण्याचे जे पाऊल उचलले आहे त्याचाही यावेळी निषेध करण्यात येणार आहे.

यावेळी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने परळ रेल्व स्थानकापासून राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयापर्यंत कामगार रॅली काढण्यात येणार आहे.