राष्ट्रवादी काँग्रेस सीमाभागातील मराठी माणसाच्या पाठीशी

667

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस सीमाभागातील मराठी लोकांच्या पाठिशी आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली.

शरद पवार यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावमध्ये गेलेले शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कानडी पोलिसांनी धक्काबुक्की केली. यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, ही कर्नाटक सरकारची भूमिका आहे. यापूर्वी कर्नाटक सरकारकडून छगन भुजबळ यांनाही हा त्रास झाला होता, त्यांना काही दिवस तुरुंगात ठेवले होते. मला स्वतःलाही कर्नाटक पोलिसांचा लाठीहल्ला सहन करावा लागला. माझ्या पाठीवर वळ उठले होते. त्यावेळी एस. एम. जोशीही माझ्याबरोबर होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस सीमाभागातील मराठी लोकांच्या पाठीशी असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

मंत्र्यांचे काम जोरात

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीविषयी ते म्हणाले की, लाड यांच्यासारख्या प्रवृत्तींना राष्ट्रवादीत पुन्हा थारा दिला जाणार नाही. महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचे काम वेगाने सुरू आहे. अजित पवार तर सकाळी आठपासून मंत्रालयात हजर असतात. छगन भुजबळांपासून सर्वच मंत्री बारा-चौदा तास काम करून लोकांचे प्रश्न सोडवीत आहेत. मंत्रालयाला जत्रेचे स्वरूप आले आहे. जनतेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. सरकारचे कामकाज ठप्प आहे हा आरोप साफ चुकीचा आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या