विधान परिषदेच्या अकरा जागांवरील निवडणुकांची मतमोजणी आज, संपूर्ण राज्याचे लक्ष निकालांकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत आलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील अकरा जागांवरील सात जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. पण उर्वरित अकरा जागांवरील मतमोजणी उद्या (सोमवारी) होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 17 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 18 मे रोजी निवडणूक जाहीर केली होती. या 17 जागांमध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. सहा मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने पुणे, ठाणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड, यवतमाळ, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 11 जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सर्वच्या सर्व म्हणजे 457 मतदारांनी मतदान केल्याने 100 टक्के मतदानाची नोंद झाली. तर अमरावती मतदारसंघात 451 पैकी 427 मतदारांनी मतदान करत 94.68 टक्के मतदान झाले, जे सर्वात कमी राहिले.

सांगली-सातारा मतदारसंघात 99.89 टक्के, सोलापूरमध्ये 99.68 टक्के धाराशीव -लातूर-बीडमध्ये 99.49 टक्के, नांदेडमध्ये 99.78 टक्के, नाशिकमध्ये 99.84 टक्के, परभणी-हिंगोलीमध्ये 99.79 टक्के संभाजीनगर -जालनामध्ये 98.90 टक्के, नागपूरमध्ये 98.44 टक्के, तर जळगावमध्ये 97.78 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानात एकूण 7 हजार 47 मतदारांपैकी 6 हजार 978 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे राज्यभरात सरासरी 99.02 टक्के इतके मतदान नोंदविण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात मतदान झाल्याने आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

संभाजीनगर लढतीकडे लक्ष

छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केले आहे. महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे, महायुतीचे सुहास शिरसाठ आणि अपक्ष उमेदवार इसाक खान सांडून खान यांच्यात तिरंगी लढत आहे.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर – अरुण लखानी (भाजप)
पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
ठाणे – रवींद्र फाटक (शिंदे गट)
रायगड -रत्नागिरी-सिंधुदुर्ग ः अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
यवतमाळ-  दुष्यंत चतुर्वेदी (शिंदे गट)
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप)