
महाराष्ट्र मातंग समाज लहुशक्तीची ताकद वाढली असून या संघटनेमध्ये मातंग समाजातील आठ प्रभावी संघटनांचे विलीनीकरण झाले आहे तसेच चार विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र मातंग लहुशक्तीसोबत काम करण्याचा एकमुखी ठराव नुकताच मुंबईत पार पडलेल्या बैठकीत संघटनप्रमुखांच्या वतीने घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र मातंग समाज लहुशक्ती ही संघटना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत ताकदीनिशी असणार आहे. हा विचार महाराष्ट्रातील मोठय़ा प्रमाणात मातंग समाजाला मान्य झाल्याने मातंग समाजातील प्रभावी काम करणाऱया ज्या संघटना आहेत त्या महाराष्ट्र मातंग समाज लहुशक्तीशी जोडल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील मातंग समाजाला राजकीय सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी लहुशक्ती वचनबद्ध असल्याची घोषणा सर्व संघटनांच्या प्रमुखांनी केली, अशी माहिती लहुशक्तीचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी दिली. यावेळी अशोकराजे सरवदे यांच्यासह संघटनांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
विलीनीकरण झालेल्या संघटना
- फकीरा युवा मोर्चा, महाराष्ट्र लहुजी सेना, संविधान बचाव परिषद, जय महाराष्ट्र मातंग एकता दल, वीर लहुजी स्वराज्य सेना, मातंग समाज परिवर्तन परिषद, मातंग समाज समन्वय समिती, राष्ट्रीय लहुजी संघर्ष समिती आदी संघटना लहुशक्तीमध्ये विलीन करण्यात आल्या आहेत.
- याशिवाय फकीरा दल, राष्ट्रीय बहुजन आघाडी, लहुजी समता सेना, बहुजन राष्ट्रीय परिषद, शिवशाही व्यापारी संघ आदी संघटना लहुशक्तीसोबत राजकीय भूमिकेसाठी सोबत असल्याचा एकमुखी ठराव यावेळी पारित करण्यात आला.
























































