अफवा रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे नवे मॉडेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

सोशल मीडियावरील अफवांमुळे मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. गेल्या दीड वर्षांत अफवांमुळे संतप्त झालेल्या जमावाने चिडून निष्पापांची हत्या केल्याच्या १४ घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अफवांना रोखण्यासाठी नवे मॉडेल विकसित करणार आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली.

धुळे येथे मूलचोरीच्या अफवेतून जमावाने पाच जणांची ठेचून हत्या केली. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले. हे  पाच जण सोशल मिडीयावरील अफवेचे बळी ठरले आहेत. यापुढे अशा अफवांना आळा घालण्यासाठी पोलीस विशेष मोहीम राबवणार आहे. याअंतर्गत  खोटे व्हिडिओ, मेसेज, पोस्ट याबद्दल लोकांमध्ये जागृती केली जाणार आहे. ज्या पोस्टच्या सत्यतेविषयी शंका आहे, अशा पोस्ट फॉरवर्ड करू नका, जेणेकरून समाजातील शांती आणि सलोखा बाधीत होईल. असे संदेश नागरिकांना दिले जाणार आहेत.  सुरुवातीला शहर आणि जिल्हास्तरावर मॉडेल तयार करून नंतर ते राज्यभरात लागू  केले जाणार आहे, असे पडसलगीकर यांना सांगितले.

कडक कारवाई होणार

आक्षेपार्ह पोस्टविषयी नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या नजरेला आलेल्या काही व्हिडिओंची चौकशी याआधीच सुरू झालेली आहे. अनेक क्लिपिंग या बनावट असल्याचे उघड झाले आहे. आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करण्यार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

अफवा रोखण्याठी काही सोशल माध्यमांची मदत घ्यायला सुरुवात केली आहे. युजर्सनी कोणत्या गोष्टी शेअर करायच्या आणि कोणत्या गोष्टी शेअर करायच्या नाहीत याबाबत त्यांना मेसेजच्या माध्यमातून जाणीव करून दिली जाणार आहे. व्हॉट्सऍप कंपनीचेही सहकार्य घेतले जाईल. काही ऑनलाइन ग्रुप आणि सामाजिक मंच यांचीही मदत घेऊ.

– दत्ता पडसलगीकर, पोलीस महासंचालक