12,500 पोलिसांची भरती! राज्य सरकारचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचे संकट ओढवले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने तरुणांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पोलीस खात्यात 12 हजार 528 पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही सर्वात मोठी पोलीस भरती असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राज्य सरकार पोलीस भरतीचा निर्णय घेणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे सर्वच भरती प्रक्रिया खोळंबली. अखेर आज मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीचा निर्णय घेताना या भरतीला वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयातून सूट देण्यात आली आहे.

ही पदे भरणार

पोलीस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती

मंत्रिमंडळ बैठकीनंतर या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांना दिली. ‘आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात 12 हजार 500 पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणींना पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे,’ असे अनिल देशमुख म्हणाले.