खो-खोमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका, ‘खेलो इंडिया यूथ गेम 2021’मध्ये सांघिक उपविजेतेपद पटकावणारा महाराष्ट्र संघ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदके जिंकत दुहेरी धमाका केला. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचा अंतिम लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागला, तर मुलांच्या संघाने सहज विजय मिळवीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. माजी विजेत्या महाराष्ट्राला स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

हरयाणात तब्बल दहा दिवस रंगलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेची खो-खो स्पर्धेने सांगता झाली. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर 21-20 (8-6, 7-9, व जादा डावात 6-5) असा अतिशय अटीतटीच्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नाणेफेक जिंकून ओडिशाने संरक्षण घेत महाराष्ट्राला आव्हान दिले. पहिल्या डावात त्यांचा होरा चुकवत महाराष्ट्राने घेतलेली 2 गुणांची आघाडी सुखावणारी होती. मात्र या आनंदावर ओडिशाच्या खेळाडूंनी जोरदार आक्रमण करत बरोबरी साधली. त्यानंतर महाराष्ट्राला आक्रमणात फक्त 6 गुणांचीच कमाई करता आली. आता सारी भिस्त संरक्षकांवरच होती. पहिली तुकडी 3ः50 मि. गारद झाल्यावर प्रेक्षकांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. मात्र जान्हवी पेठे व प्रीती काळे यांनी ओडिशाच्या मनसुब्यांना सुरुंग लावत विजयात मोठी कामगिरी बजावली.

पदक तालिका (टॉप-10)

क्र.    राज्य     सु   रौ   कां एकूण

01)   हरयाणा    52   39   46   137

02)   महाराष्ट्र    45   40   40   125

03)   कर्नाटक    22   17   28      67

04)   मणिपूर     19   04   05      28

05)   केरळ        18   19   18      55

06)   दिल्ली      15   15   49      79

07)   तामीळनाडू      14   14   24               52

08)   मध्य प्रदेश 12   11   15      38

09)   पंजाब       11   15   16      42

10)   राजस्थान  08   09   15      32

महाराष्ट्रावर हरयाणाची सरशी

खेलो इंडिया स्पर्धेला 2018मध्ये सुरुवात झाली. नवी दिल्लीमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या हंगामातील पदकतालिकेत हरयाणाने ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज केले होते, तर महाराष्ट्राला दुसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. खेलो इंडियाचा दुसरा हंगाम 2019मध्ये पुणे, तर तिसरा हंगाम 2020मध्ये गुवाहाटी येथे पार पडला. या दोन्ही हंगामांत पदकतालिकेत महाराष्ट्राने बाजी मारली होती, तर हरयाणाला दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा हरयाणाने यजमानपदाचा फायदा उठवत पुन्हा एकदा ‘नंबर वन’चे स्थान पटकावले.

25 खेळ; 1688 पदके

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा चौथा हंगाम 4 ते 13 जून असा दहा दिवस रंगला. या स्पर्धेत 25 प्रकारच्या खेळांमध्ये देशभरातील 8500 खेळाडूंनी एकूण 1688 पदकांसाठी काwशल्य पणाला लावले. यात 545 सुवर्ण, तितकीच रौप्यपदके आणि 776 कास्यपदकांचा समावेश होता.