महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण; छगन भुजबळ यांच्या अडचणींत वाढ

 

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात मिंधे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. आधी आमचे म्हणणे ऐका, नंतर आरोपींच्या दोषमुक्ततेच्या अर्जांवर सुनावणी घ्या, अशी विनंती संबंधित आरोपींतर्फे ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट यांनी सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाला केली.

महाराष्ट्र सदन बांधकामातील 850 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने 2016मध्ये छगन भुजबळ, पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्याच्या खटल्याची सुनावणी विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुरू आहे. सोमवारी काही आरोपींतर्फे त्यांच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर युक्तिवादाला सुरुवात करण्यात आली. या वेळी सुनील नाईक, सुधीर सालस्कर, अमित बलराज या तीन आरोपींतर्फे ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट आणि ऍड. दीप्ती कराडकर यांनी बाजू मांडली.

न्यायालयाने इतर आरोपींच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर सुनावणी घेण्याआधी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, असा युक्तिवाद करीत ऍड. मर्चंट यांनी संबंधित तीन आरोपींच्या माफीचा साक्षीदार बनण्याच्या अर्जांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यांच्या युक्तिवादाची न्यायाधीश रोकडे यांनी गंभीर दखल घेतली आणि तिघांच्या अर्जांवर ईडीला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी 20 डिसेंबरला आहे.