
सामना प्रतिनिधी । पुणे
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही जिल्हा प्रतिनिधींनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मात्र दबावतंत्राचा वापर करून निवडणूक बिनविरोध करण्यापेक्षा कार्यक्षम लोकांना संधी मिळण्यासाठी लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया राबवायला हवी, अशी अजित पवार यांची इच्छा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
येत्या 25 नोव्हेंबरला राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी 12 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली असून बुधवारपर्यंत (दि. 14) अर्ज भरण्याची मुदत आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता, मात्र उद्या अखेरच्या दिवशी बऱयाच जागेसाठी अर्ज दाखल होतील. 15 नोव्हेंबरला आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 16 ते 19 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असेल, मात्र अर्ज भरण्यापूर्वीच दबावतंत्राला सुरुवात झाल्याने आणि गटातटाचे राजकारण सुरू झाल्याने अध्यक्षपदाचे उमेदवार अजित पवार यांनीही राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फारसा रस दाखवलेला नाही. आपल्या जिह्याला महत्त्वाचे पद मिळविण्यासाठी प्रत्येकाचेच कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ही निवडणूक अटळ असल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणूक झाल्यास विदर्भ वगळता 25 संलग्न जिल्हा संघटनेतील 74 मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न
‘गटातटाचे राजकारण बाजूला ठेवण्यासाठी आणि निवडणुकीच्या निमित्ताने होणारा संघर्ष टाळण्यासाठी शक्य तो राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला तरी उद्या अखेरच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ असा नवीन नियम केल्यामुळे एकच उमेदवार अनेक पदासाठी अर्ज भरू शकणार नाही. तरीही इच्छुंकाची मोठी गर्दी असल्याने शेवटच्या दिवसापर्यंत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’
– आस्वाद पाटील, सेक्रेटरी, राज्य कबड्डी संघटना

























































