विदेशी पर्यटकांसाठी महाराष्ट्र असुरक्षित! ‘क्राईम इन इंडिया-2024’च्या अहवालातून धक्कादायक माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

हिंदुस्थानात आलेल्या विदेशी नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदी विभागाच्या (एनसीआरबी)च्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

‘क्राईम इन इंडिया-2024’ या अहवालानुसार, देशात 2024 मध्ये परदेशी नागरिकांच्या विरोधात 257 गुन्ह्यांची नोंद झाली. यापैकी 156 नागरिक पर्यटनासाठी हिंदुस्थानात आले होते. यात सर्वाधिक 42 गुन्हे चोरीचे घडले, तर 21 गुन्हे विशेष कायद्यांच्या अंतर्गत दाखल झाले. 20 गुन्हे बलात्काराचे, तर 15 गुन्हे हत्येचे होते. देशातील सर्वाधिक 41 गुन्हे हे एकट्या महाराष्ट्रात घडल्याने महाराष्ट्र राज्य विदेशी नागरिकांसाठी असुरक्षित असल्याचे दिसत आहे.

राज्यात परदेशी नागरिकांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांची तुलना केली तर 2022 मध्ये 21 गुन्ह्यांची तर 2023 मध्ये 19 गुन्ह्यांची नोंद झाली होती. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये यात दुपटीने वाढ होऊन 41 गुन्हे दाखल झाले. दुसरीकडे, गुन्हेगारीबाबत महाराष्ट्रानंतर येणाऱ्या कर्नाटक राज्यात 2022 मध्ये 28 तर 2023 मध्ये 32 गुन्हे दाखल झाले होते. मात्र महाराष्ट्रात याच कालावधीत गुन्हे दुपटीने वाढले आहेत.

परदेशी नागरिकांकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक 134 गुन्हे पासपोर्ट कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आले. याशिवाय परदेशी नागरिक नोंदणी कायदा (119 गुन्हे), एनडीपीएस कायदा (96), बनावट कागदपत्रे (13) या गुन्ह्यांचा समावेश आहे.
देशनिहाय परदेशी आरोपींचा विचार केला तर सर्वाधिक 309 आरोपी बांगलादेशमधील आहेत. यानंतर नायजेरिया (109), नेपाळ (576), म्यानमार (247), श्रीलंका (192) या देशांचा समावेश आहे.